‘प्रोग्रेसिव्हां’च्या पिढीतले (पण त्या गटात नसणारे) चित्रकार ए. ए. रायबा यांच्या निधनाला पुढल्या वर्षी, १५ एप्रिल २०१७ रोजी एक वर्ष पूर्ण होईल. सहसा दिवंगत चित्रकारांच्या पहिल्या स्मृतिदिनी जशी, त्यांच्या आयुष्यभरच्या अनेक वर्षांतल्या, विविध टप्प्यांतल्या कलाकृतींची प्रदर्शनं भरवली जातात, तसं प्रदर्शन ‘क्लार्क हाऊस’ या मुंबईतल्या महत्त्वाच्या प्रायोगिक कलादालनात उद्यापासून (शुक्रवार, २८ ऑक्टोबर २०१६ पासून) सुरू होणार आहे.
रायबांचं पूर्ण नाव अब्दुल अझीझ रायबा. चित्रकलेचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते काश्मीरला गेले आणि तिथल्या लोकजीवनाचा तसंच निसर्गाचा त्यांच्यावर प्रभाव पडला, हे सांगणारी त्यांची चित्रं अनेकांनी पाहिली असतील. पण काश्मीरनंतर रायबा तामिळनाडूलाही गेले होते आणि ‘काश्मिरी पंडित आहे’ असं सांगून त्यांनी मंदिरं आतूनही पाहिली होती, हे या प्रदर्शनातून समजेल. रायबा हे तागाच्या कापडावर प्रक्रिया करून, त्यावर रंगवलेल्या चित्रांसाठी खासच ओळखले जातात. तशी चित्रं इथं या प्रदर्शनात आहेतही; पण त्यापेक्षा निराळी आणि सहसा न दिसणारी काही चित्रंही आहेत. ‘मॉडर्निस्ट’ रायबा यांच्यावरले खरे प्रभाव हे लघुचित्र-परंपरेपासून ते अमृता शेरगिलपर्यंतचे आहेत, हे इथं प्रेक्षकाला उमगेल. तागाचा वापर कॅनव्हाससारखा करणाऱ्या चित्रांमधले आकार रायबांनी काहीसे सपाट ठेवले असले तरी त्याआधीची साध्या कॅनव्हासवरली चित्रं गोलाईला महत्त्व देणारी आहेत, हे लक्षात येईल. त्याहून नजरेत भरेल, तो या चित्रांतल्या झाडांचा ऐंद्रिय(सेन्शुअस)पणा!
रायबा यांनी मुद्राचित्रंही केली होती. ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या मुद्राचित्रण विभागानं रायबा हयात असताना त्यांच्या चित्रांवर आधारित अशी, आजी-माजी विद्यार्थ्यांची एक कार्यशाळाच घेतली होती. तो ठेवाही या प्रदर्शनात आहेच. अवघ्या १४ कलाकृतीच या प्रदर्शनात असल्या, तरी सिंहावलोकनी प्रदर्शनाचा अभ्यासू बाज त्यात नक्कीच आहे.
‘क्लार्क हाऊस’ ही गॅलरी मध्यवर्ती ठिकाणी आहे. रीगल सिनेमासमोरच्या ‘सहकारी भांडार’च्याही समोरील फुटपाथवर ‘क्लार्क हाऊस’ नावाच्याच इमारतीचं प्रवेशदार आहे, तिथून आत गेल्यावर डाव्या बाजूचं पांढरं दार ‘क्लार्क हाऊस कलादालना’चंच. हे कलादालन विक्रीऐवजी प्रायोगिक कलांना प्राधान्य देणारं आहे आणि ‘रायबा हे पुढल्या अनेक प्रयोगांना दिशा देणारे कलावंत होते’ असा या दालनाचा विश्वास आहे.
अमूर्त-दर्शन
जहांगीर कलादालनात संजय सावंत आणि शेजारच्याच ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’च्या आतल्या ‘जहांगीर निकल्सन दालना’त लक्ष्मण श्रेष्ठ, असा अमूर्तदर्शनाचा योग चालू आठवडय़ात जुळून आलेला आहे. संजय सावंत हे प्रयोगशील अमूर्तकार असून त्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन ३१ ऑक्टोबपर्यंतच सुरू राहणार आहे. मग एक नोव्हेंबरपासून, भोपाळचे आणि ‘रझा चित्रशैली’शी अधिक नातं सांगणारे अमूर्त चित्रकार अन्वर यांचं प्रदर्शन ‘जहांगीर’मध्येच सुरू होईल.
‘गृहसजावट’ नाही; कलाच!
‘कम इन’ या नावाचं आणि ‘जर्मनीत समकालीन कलेचं एक अंग म्हणून इंटीरिअर डिझाइनचा होणारा विचार’ अशा अर्थाच्या उपशीर्षकाचं एक प्रदर्शन येत्या ५ नोव्हेंबरपासून रीगल सिनेमासमोरच्याच ‘राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालया’त सुरू होणार आहे. इथं आर्किटेक्चर, इंटीरियर आदी शाखांचे विद्यार्थी येतीलच; पण चित्रकारांनी आणि कलाप्रेमींनीही मुद्दाम पाहावं असं हे प्रदर्शन आहे. ‘अंतर्गत रचना’ (किंवा ‘सजावट’) एवढय़ापुरताच मर्यादित विचार न करता ‘कलाकृती’साठी, अंतर्गत रचनेची तंत्रं वापरणारं हे प्रदर्शन आहे. त्याच्या निमंत्रणावर जी प्रतिमा आहे ती एखाद्या छानशा- पण अस्ताव्यस्त- खोलीसारखी दिसते. पण प्रत्यक्षात, एका गाजलेल्या गुन्ह्य़ाच्या पोलिसी वर्णनावरून जशीच्या तशी उभी केलेली खोली आहे ती! किंवा, डोरोथी गोल्झ यांनी खुर्चीला जोडूनच केलेल्या काचेच्या टीपॉयवर ठेवलेले, एकमेकांना जोडलेले कप, ही ‘कम्युनिकेशन मॉडेल’ नावाची कलाकृती आहे.. फक्त एवढंच की, ती स्वागतकक्षातच ठेवली तरी चालेल, असं डोरोथी यांना वाटतं.