चित्रकार आणि गूढविद्येचे चिंतनशील अभ्यासक निकोलस रोरिक (जन्म १८७४- मृत्यू १९४७) यांच्या घराचं रूपांतर संग्रहालयात झालं आहे; पण ते संग्रहालय महाराष्ट्रापासून खूपच दूर – हिमाचल प्रदेशात कुलू आणि मनाली यांच्या मधल्या नग्गर नावाच्या गावात आहे. त्याखालोखाल रोरिक यांची सर्वाधिक चित्रं आहेत ती अलाहाबादच्या संग्रहालयात. नग्गरला काही महाराष्ट्रीय चित्रप्रेमी गेलेही असतील; पण अलाहाबादमधली चित्रं कुणी नसतील पाहिली.. ती पाहण्याची संधी आता मुंबईत मिळते आहे!
रीगल सिनेमाच्या चौकात, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या(पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम)समोरच ‘नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट नावाचं पाच मजली कलादालन आहे. त्याच्या तळमजल्यावरच ही अलाहाबादची २५ चित्रं आणि नॅशनल गॅलरीनं दिल्लीतून काढलेल्या ‘प्रिंट’पैकी रोरिकचे काही प्रिंट अशी सुमारे ३० चित्रं आहेत. ती पाहायलाच हवीत. शक्यतो विद्यार्थ्यांसह, सहावीपासून पुढल्या मुलांसह पाहायला हवी. कारण मूळचा रशियातला हा चित्रकार भारतात येतो, तिबेटपासून काश्मीपर्यंतचा सारा हिमालय हिंडतो आणि भारतीय अध्यात्मासोबतच तिबेटी बौद्ध (हीनयान) अध्यात्म, त्या वेळी पश्चिमेकडील चिंतकांमध्ये पौर्वात्य प्रभावामुळे रुजू पाहत असलेला गूढवाद आणि रशियन प्रतीकात्मता या साऱ्यांची सांगड आपल्या चित्रांशी घालतो, ही विसाव्या शतकातली महत्त्वाची सांस्कृतिक घडामोड आहे. तिची माहिती आपल्याला चित्रांमधून सहजसोप्या पद्धतीनं अनायासे होते आहे!
रशियन चर्चचं चित्र, रशियन (ऑथरेडॉक्स चर्चच्या) बायबलमधल्या चित्रांसारखं दिसणारं ‘लाइट पेन्रिटेटिंग डार्कनेस’ (अंधाराला वेधणारा प्रकाश) हे चित्र, हिमालयाची पाश्चात्त्य पद्धतीनं रंगवलेली निसर्गचित्रं, ‘होली शेफर्ड’ हे आलंकारिक शैलीतलं, तुर्कमेनिस्तान/ अझरबैजान आदी प्रदेशांतील ‘लेल’ या नायकाच्या कथेवर आधारित असूनही बन्सीधर कृष्णाचीच आठवण देणारं चित्र, बौद्ध मठ आणि बुद्धमूर्ती यांच्यासह हिमालयचित्रं, बौद्ध प्रतीकांच्या तसंच ‘गुगा चौहान..’सारख्या लोककथांच्या आधारे चित्रं, तपपूत आनंदानं थंडीवाऱ्याची पर्वा न करणाऱ्या प्रवृत्तीचं ‘एक्स्टॅसी’ हे चित्र आणि ‘मेसेंजर ऑफ शंभाला’सारखं स्वतची प्रतीकभाषा निर्माण करणारं चित्र अशी एक संगती या चित्रांतून लावता येईल.
इथली बहुतेक चित्रं कागदावर वा कॅनव्हासवर ‘टेम्परा’ प्रकारच्या रंगांमध्ये आहेत. कॅनव्हासवरलं रंगलेपन हलकेच, तर कागदावरलं अधिक घट्ट दिसेल; हा त्या रंगसाधनाचा गुणधर्म. हिमालयीन निसर्गदृश्यांची शैली पाश्चात्त्यच असली, तरी दिवंगत चित्रकार माधवराव सातवळेकर किंवा कोल्हापूर-सांगलीच्या अनेक विद्यमान चित्रकारांच्या निसर्गचित्रणाशी तिचा सांधा जुळतो, हे आठवून पाहिल्यास ती शैली किती ‘आपली’ आहे हेही उमगेल.
पाश्चात्त्य शैली, ‘भारतीय’ विषय.. पण आशय मात्र वैश्विकच, असं रोरिक यांच्या चित्रांचं वर्णन करता येईल. नेमकं हेच वर्णन कार्मेल बर्कसन यांच्या शिल्पांनाही लागू पडतं आणि तीही अगदी इथंच- याच गॅलरीच्या पहिल्या मजल्यावर मांडलेली आहेत. रोरिकनं जशी अलाहाबादच्या संग्रहालयाला चित्रं देऊन टाकली होती, तशी कार्मेलबाईंनीही नॅशनल गॅलरीला ही शिल्पं कायमची दान केली आहेत. हा दिलदारीचा आणि त्याहीपेक्षा आपलं काम लोकांनी बघावं याच्या तळमळीचा धागाही दोन मजल्यांवरच्या दोन प्रदर्शनांना जोडतो.
कार्मेल यांच्या या शिल्पांचे विषय पौराणिक आहेत, हे त्या शिल्पांखाली नावं नसती किंवा भिंतींवर शिल्पांमागल्या संदर्भाची माहिती लावलेली नसती, तर फार कमी जणांना कळलं असतं. पण ही लक्ष्मी, हा नरसिंह आणि हिरण्यकश्यपु, ही महिषासुरमर्दिनी.. असं वाचल्यावर पुन्हा शिल्पं पाहताना मजा येईल.. बरंच काही कळू लागेल. कार्मेल यांनी १९७० पासून प्राचीन भारतीय (प्रामुख्यानं हिंदू) शिल्पकलेचा अभ्यास आणि छायाचित्रण सुरू केलं. १९७७ पासून त्यांनी मुंबईतच बस्तान हलवलं. त्यांच्या अभ्यासाला ‘पद्मश्री’ची दादही २०१० मध्ये मिळाली. भारतीय लेणी, मंदिरं यांतल्या शिल्पांमधली भूमिती त्यांनी शोधली; हा ‘दृश्यकला’ म्हणून त्या प्राचीन शिल्पांना पुन्हा सन्मान मिळवून देण्याचाच प्रयत्न ठरला! तेवढय़ानं स्वस्थ न बसता, मूळच्या शिल्पकार असलेल्या कार्मेलबाई २००१ पासून ब्राँझ-शिल्पं घडवू लागल्या. पाश्चात्त्य- आधुनिकतावादी दिसणाऱ्या या शिल्पांमध्ये दूरान्वयानं भारतीय शिल्पांमधली वर्तुळं, त्या शिल्पांचा त्रिकोणी वा चौकोनीपणा, उभ्या-आडव्या अक्षांवर शिल्पातला विषय मांडून प्रेक्षकाची नजर चौफेर फिरवण्याचं इंगित.. या साऱ्या आकारविशेषांचं सार देणारी आहेत.
भारतीय चित्रकारांवर ‘पाश्चात्त्यांच्या आहारी गेलेले’ अशी टीका (विविध हेतूंनी) होतच असते. पण देशसीमेत स्वतला बांधून न घेता विश्वसंस्कृतीकडे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न कलावंतानं केल्यास त्या जगाच्या इतिहासात भर पडते ती कशी, हे या दोन प्रदर्शनांमधून कुणाच्याही मनावर ठसावं! त्यासाठी तरी या आवर्जून, अगदी दहा रुपयांचं तिकीट काढून ही प्रदर्शनं पाहायलाच हवीत. सोबत, याच गॅलऱ्याच्या पुढल्या तीन मजल्यांवर आधुनिक आणि समकालीन भारतीय चित्रकारांचीही चित्रं आहेत. त्यांनी स्वदेशाच्या संस्कृतीशी कसं नातं जोडलं होतं, हेही उघडय़ा डोळ्यांनी पाहता येईल.