शमित (किंवा समित) दास हे पश्चिम बंगालमध्ये वाढलेले, पण गेली अनेक र्वष दिल्लीत राहणारे दृश्यकलावंत. दहा वर्षांपूर्वी मुंबईतल्या प्रदर्शनात त्यांनी फोटो आणि जलरंगचित्रं यांचं एकत्रीकरण करून, त्यातून वास्तुरचनांचा प्रत्यय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी शांतिनिकेतन आणि टागोरांचं घर (जोराशंको हाऊस) यांच्या वास्तुरचनेचाच नव्हे, तर त्या वास्तूतून इतिहासाचा जो प्रत्यय येतो त्याचाही अभ्यास केला. त्या अभ्यासाचं रीतसर पुस्तकच झालं. ते पुस्तक बंगालच्या सांस्कृतिक अभ्यासासाठी महत्त्वाचं मानलं जावं, असं आहे. पुस्तक लिहिल्यावरही ‘वेगळी वाट शोधणारे दृश्यकलावंत’ ही शमित दास यांची ओळख कायम राहिली. शमित हे केवळ दृश्याचा- जेवढं दिसतं तेवढय़ाचाच- विचार करत नाहीत, तर आपल्याला जे दिसतंय ते आपण कोणकोणत्या संवेदनांनी पाहणार आहोत याचाही विचार करतात, असं त्यांच्या कलाकृतीच लोकांना सांगू लागल्या.
मुंबईतल्या दोन कलादालनांमध्ये त्यांच्या कलाकृती सध्या एकाच वेळी पाहायला मिळत आहेत. यापैकी तुलनेनं लहान आकाराचं प्रदर्शन ‘क्लार्क हाऊस’च्या (सहकारी भांडारासमोरची इमारत) कलादालनात आहे, तर मोठं प्रदर्शन हे गेटवे ऑफ इंडियाकडे जाणाऱ्या रस्त्यावरल्या ‘धनराज महल’ या चिनी आकारांच्या इमारतीच्या आवारात अगदी अखेपर्यंत तीसेक पावलं चाललात की, तळमजल्यावरच असलेल्या ‘तर्क’ नावाच्या गॅलरीत आहे. ही गॅलरी दुमजली. तिथं खालच्या मजल्यावर छान पांढऱ्या फ्रेममधली काही चित्रं आहेत, ड्रॉइंगवजा; पण बाकीच्या भिंतीवर मात्र शिल्पांच्या चौकटी आहेत! गॅसशेगडीचा किंवा फ्लॅट स्क्रीन टीव्हीचा खोका असतो तेवढय़ाच खोल लाकडी खोक्यांसारख्या आकारांमध्ये अनेकपरींची साधनं वापरून ही शिल्पं घडली आहेत.
सर्व कलाकृती पाहून झाल्यानंतर आणखी एक तिसरी शक्यता जाणवते. ती अशी की, शमित दास हे इतिहास – इतिहासाच्या भौतिक रूपांची पडझड – पुस्तकांतूनच इतिहास अधिक भेटत राहणं आणि आपला आत्ताचा सभोवताल – त्यातली पडझड या दोन्ही अनुभवांची सांगड घालत आहेत! ही तिसरी शक्यताच अधिक खरी आहे, असं दास यांनीही (गेल्या शनिवारी या कलादालनानं कुणाहीसाठी खुला असलेला ‘चित्रकारासोबत प्रदर्शनफेरी’ (वॉकथ्रू विथ द आर्टिस्ट) असा कार्यक्रम ठेवला होता, तेव्हा) सांगितलं. दास पुढे सांगत होते : माझा स्टुडिओ हरयाणात, बदरपूरला आहे. हे एक बिल्डिंगांनी बुजबुजलेलं खेडं! स्टुडिओची इमारत काचेची आहे, पण धुळीचं साम्राज्य सगळीकडे. ही धूळ मी आधी नाकारायचो. या कामांमध्ये मी ती सरळ स्वीकारली. धुळीवर फिक्सेटिव्ह, वॉर्निश वगैरे लावून तिला या कलाकृतींचा अविभाज्य, अंगभूत भाग करून टाकलं.
आता दास यांच्या या कलाकृतींतले पुढले-पुढले ‘अर्थ’ कळू लागतील. चित्राचा अर्थ कळणं म्हणजे त्यामागल्या सौंदर्यदृष्टीशी एकरूप होणं. त्या अर्थानं, या शिल्पांमागली सौंदर्यदृष्टी जाणवू लागेल. वरवर पाहता ही शिल्पं पडझडीची, अस्ताव्यस्त वाढीची किंवा वारसा नावापुरताच उरल्याची जाणीव देतात हे खरं; पण त्या जाणिवांच्याही पलीकडे आपली एक उमज असते की नाही? इतिहासानं- गतसंस्कृतींनी- थोडं मागे हटायलाच हवं आणि बदलांना वाट मिळायला हवी, असं आपल्याला उमगलेलं असतं की नाही? बहुतेकदा असतं; पण आपण ते कबूल मात्र करत नाही, कारण या बदलामधली तगमग आणि त्रासच आपल्याला दिसत असतो.
ती तगमग इथं दृश्यरूप होऊन साकारली आहे, असं समजून ही शिल्पं पाहिल्यास कदाचित, त्रासातलंही सौंदर्य जाणवू लागेल. जाणवेलच असं नाही; पण ही एक शक्यता, शमित दास यांच्या कलाकृतींमधून खुली होते आहे.
अमूर्त चित्रं पाहणारे, वास्तुरचनांमधलं सौंदर्य (तोल/लय/ विरोधाभास या डिझाइन-मूलतत्त्वांच्या पलीकडचं सौंदर्य) जाणवणारे, जुनी पुस्तकं किंवा जुने खिडक्या-दरवाजे आवडणारे, अशा लोकांनी हे प्रदर्शन जरूर पाहावं. कारण शमित दास यांना अभिप्रेत असलेला सौंदर्यप्रत्यय हा अशा अनेक लोकांना येतच असतो. दास यांनी फक्त त्याचं एक ठसठशीत रूप दाखवलं आहे!
‘जहांगीर’ आणि ‘नेहरू’
‘जहांगीर आर्ट गॅलरी’चं मोठं ‘सभागृह दालन’ सध्या दिवंगत चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांच्या चित्रांनी फुललं आहे. प्रफुल्ला डहाणूकर फाऊंडेशननं, त्यांच्या स्मृत्यर्थ भरवलेलं हे प्रदर्शन बहुश: अमूर्त चित्रांचं असलं, तरी प्रफुल्ला यांनी १९५०-६० च्या दशकात केलेली काही मानवाकृतीप्रधान चित्रंही इथं आहेत. ‘जहांगीर’मध्येच एकामागोमाग जी तीन ‘प्रदर्शन-दालनं’ आहेत, त्यापैकी पहिल्या दालनात प्रगती चव्हाणके यांची मुद्राचित्रं (ग्राफिक्स) आहेत. घरं, घरांतल्या वस्तू, कार, फ्रिज, अशा प्रतिमांमधून त्यांनी आशय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुढल्या दोन दालनांत अनुक्रमे प्रेमचंद ढाल आणि अन्वरहुसैन पट्टेकरी यांच्या कलाकृती आहेत.
वरळीच्या ‘नेहरू सेंटर आर्ट गॅलरी’मध्येही दोन दालनं आहेत. यापैकी ऐसपैस चौकोनी दालनात सध्या भास्कर सगर यांच्या जलरंगचित्रांचं प्रदर्शन सुरू आहे. ही चित्रं ‘प्रेक्षणीय स्थळां’ची आहेत आणि त्यामागे इतिहास हे सूत्र आहे. बद्रीनाथ, चामुंडा हिल्स (नंदी) अशी मध्यमवर्गीयांना परिचित ठिकाणं, महाबलिपुरमसह अनेक प्रस्तरमंदिरं, खजुराहो आदी मंदिरांबाहेरची शिल्पं यांबरोबरच ‘भारतीय जीवनपद्धती’चा आदर करणारा सम्राट अकबर यानं ‘विविधता में एकता’ या सूत्राचं दर्शन त्याच्या काळातच वास्तुशिल्पामधून कसं घडवलं होतं याची साक्ष देणारी फत्तेपूर सिक्री येथील ‘पंचमहाल’ची इमारत, अशी चित्रं या प्रदर्शनात आहेत. ‘नेहरू सेंटर’चं दुसरं दालन तळमजल्यावरच गोल जिन्याच्या भोवती असून तिथं सुहास रावराणे यांची चित्रं पाहायला मिळतील.