संजीव मिरजकर,रेहान इंजिनीअर आणि अमितेश श्रीवास्तव या तिघा तरुण चित्रकारांचं प्रदर्शन मोठय़ा आकाराच्या ‘प्रोजेक्ट ८८’ कलादालनात भरलं असल्यामुळे प्रत्येकाच्या पुरेशा कलाकृती इथं पाहायला मिळतात आणि जणू काही, तीन वेगवेगळी एकल प्रदर्शनं (सोलो एग्झिबिशन) पाहिल्याचा आनंद एकाच ठिकाणी मिळतो! या तिघांच्या कामांमध्ये वरवर पाहता कोणतीही संगती दिसत नसली, तरी आंतरिक संगती सांगण्याचं कठीण काम प्रदर्शनाच्या विचारनियोजक प्रज्ञा देसाई यांनी केलं आहे. प्रदर्शनाच्या प्रत्येक विभागात तिघांच्याही कलाकृती ठेवून, त्या विभागाचं वैशिष्टय़ प्रेक्षकांना सांगणारा मजकूर देसाई यांनी लिहिला, तो या गॅलरीच्या भिंतींवरच कुणालाही वाचता येतो. अर्थात, हा मजकूर समजा नाही वाचला, तरीही चित्रं भिडतीलच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजीव मिरजकर यांनी कशाचं चित्र काढलं आहे, हे लक्षात आल्यावर त्या चित्राबद्दल आपलेपणाच वाटू लागतो! वरवर पाहता केवलाकारी भासणारी ही चित्रं, नव्या वस्तूच्या खोक्यामध्ये पॅकेजिंगचा भाग म्हणून जाड पुठ्ठय़ाचा जो साचेदार कप्प्यांचा भाग असतो त्यांचीच आहेत. चित्र नीट निरखलंत तरीही काही क्षणांत हे ओळखता येतं. मग कुतूहल कमी न होता वाढतंच. या कप्प्यांमध्ये कुठलीतरी आजच्या काळातली वस्तू असणार.. तसा हा कप्पेबंद भागही चंगळवादाचंच प्रतीक एक प्रकारे..  तरीही संजीव मिरजकरांच्या चित्रांमध्ये हे कप्पे कसे शांत, रंगानं हिरवट असूनही काळसर पोक्त छटा दाखवणारे आहेत.. असं कसं काय? या कप्प्यांकडे संजीव मिरजकर फक्त ‘आकार’ म्हणूनच पाहताहेत, हे या प्रश्नाचं त्यांच्या चित्रांमधूनच मिळणारं उत्तर. या कप्प्यांमध्ये काय होतं याच्याशी ; किंवा ती जी कुठली वस्तू होती ती वापरायला काढल्यावर हा कप्पेबंद पॅकेजिंगचा भाग कुठे फेकला गेला वगैरे प्रश्नांशी चित्रकार म्हणून मिरजकर यांचा काहीही संबंध नाही. मग, ही चित्रं ‘हुबेहूब’ त्या कप्प्यांसारखीच आहेत म्हणून हा व्यक्तिचित्रणासारखा प्रकार मानायचा की त्यांत आकारच महत्त्वाचे आहेत म्हणून केवलाकारी? आणखी अचूक (पण जरा कठीण) शब्दांत सांगायचं तर, ‘रूपनिर्मितीकडे पाहण्याचा मिरजकरांचा दृष्टिकोन इतका संश्लिष्ट कसा?’ असाही प्रश्न पडेल.

रेहान इंजिनीअर यांची भरपूरच चित्रं इथं आहेत. त्यांत शब्दांचा सढळ वापर आहे आणि हे शब्द लेखक-कवींपेक्षा निराळय़ा हेतूंनी व निराळय़ा पद्धतीनं वापरायचेत असा प्रयत्न दृश्यकलावंत म्हणून रेहान यांनी केला आहे, हे लक्षात येईल. अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांच्या कारकीर्दीत अमेरिकी अर्थव्यवस्थेत कशी तेजीमंदी होती याचे आलेख आखून, त्या एकत्रीकरणाला ‘अमेरिकी अध्यक्षांची व्यक्तिचित्रं’ असं शीर्षक रेहान यांनी दिलं आहे.. अगदी मोकळय़ा हातानं केलेलं ड्रॉइंग हाही त्यांच्या कामाचा भाग आहेच, पण लक्षात राहील तो शब्दवापर.

अमितेश श्रीवास्तव यांचा भर ड्रॉइंगवर आहे. रंगचित्रामध्येही चित्रकारीय हालचालींचा वेग रंगांच्या फटकाऱ्यांतून कसा आणता येईल आणि त्या कृतीमालिकेतूनच चित्रात भावना कशा उतरतील, याचे प्रयोग त्यांनी आधीपासून सुरू ठेवलेले आहेत. याची साक्ष देणारं इथलं एक चित्र म्हणजे ‘डॉक्टर कुरेशी’. अमितेश छत्तीसगडच्या ज्या छोटय़ा गावात राही, तिथले हे डॉक्टर.. नेहमी त्यांच्या जुनाट स्कूटरवरून घाईनं कुठेतरी जाताना दिसणारे. त्या स्कूटरचा जो वेग या चित्रातून दिसतो, त्यापेक्षा चित्रकारीय हालचालींचा वेग कमीच असेल; पण एकंदर चित्रात रूपांकनाची पद्धत आणि चित्रविषय, आशय यांचा मेळ जमला आहे. याच डॉ. कुरेशींची काही ड्रॉइंग, तसंच अमितेश यांची अन्य चित्रंही इथं आहेत.

‘प्रोजेक्ट-८८’मध्ये जाण्याच्या निमित्तानं कुलाब्याचं निराळं रूप दिसतं. कुलाबा मार्केटच्या पुढला बसस्टॉप असलेल्या ‘कुलाबा फायर स्टेशन’ला उतरून डावीकडल्या ‘मुकेश मिलची गल्ली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यानं जरा पुढे गेलात, की म्युनिसिपल शाळेच्या समोर, ‘बीएमपी कम्पाउंड’मध्ये गोदामवजा जागेत ही गॅलरी आहे. जागा प्रशस्त, त्यामुळे भरपूर चित्रं इथं सहज मावली आहेत. चित्रभाषांचा (आणि त्या भाषेत शब्दांनी केलेल्या घुसखोरीचाही) विचार करण्यासाठी जरूर जावं, असं हे प्रदर्शन आहे.

माहितीची मांडणी

रीगल सिनेमाच्या चौकातच असलेल्या ‘राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालया’मध्ये (इंग्रजीत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट- एनजीएमए) नाटय़कर्मीच्या तीन पिढय़ा घडवणारे थोर आणि ऋ षितुल्य नाटय़दिग्दर्शक, नाटय़अध्यापक इब्राहिम अल्काझी यांचा जीवनपट मांडणारं प्रदर्शन भरलं आहे, ते १८ ऑक्टोबरच्या मंगळवापर्यंतच असून त्यातही सोमवार हा ‘एनजीएम’च्या सुट्टीचा दिवस असतो. ही तारीख पाळून अगदी रविवारसह कधीही ११ ते संध्याकाळी ५.३० या वेळात हे प्रदर्शन पाहाता येईल.

तर, जहांगीर आर्ट गॅलरीच्या मागल्या बाजूला ‘मॅक्समुल्लर भवना’च्या कलादालनात भरलेलं ‘इंटरनॅशनल रिलेशन्स : यंग आर्किटेक्ट्स फ्रॉम जर्मनी’ या नावाचं प्रदर्शन हे १५ तरुण जर्मन वास्तुशिल्पींनी जगभर कुठेकुठे उभारलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती देतं. हे प्रदर्शन २६ तारखेपर्यंत आहे.

नाटकाची वा आर्किटेक्चर या ज्ञानशाखेची आवड असणारे इथं जातीलच. पण दृश्यामुळे काय काय घडू शकतं, माहितीची मांडणी किंवा व्यापक अर्थानं इन्फोग्राफिक्स म्हणजे काय, याचा अनुभव घेण्यासाठी स्वतला सामान्य समजणाऱ्यांनीसुद्धा मुद्दाम दोन्ही प्रदर्शनं पाहावीत. कदाचित अल्काझींनी सादर केलेलं एकेक नाटक, त्याची माहिती हे सारं प्रत्येकाला भिडेलच असं नाही, किंवा त्या १५ जर्मन तरुणांच्या कंपन्यांनी उभारलेल्या प्रत्येक इमारतप्रकल्पाचे तपशील पाहावेसे वाटतील असं  नाही.. कदाचित ‘अल्काझी महान आहेत’ आणि ‘इमारतसंकल्पना बदलत आहेत’ एवढंच उमगेल.. पण दोन्ही प्रदर्शनांतून माहितीच्या मांडणीचे प्रयोग कसे केले होते, हे नंतरही आठवत राहील!

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Painting exhibition at project 88 art gallery