आपण सगळेचजण फोटो काढतो, हल्ली चांगलेसुद्धा काढतो.. मग फोटोग्राफीची प्रदर्शनं मुद्दाम कशाला पाहायची? विशेषत फोटोग्राफर नामवंत नसेल किंवा फोटोंमधला विषय ‘माझं आत्मवृत्त, माझ्या स्मृती’ असाच काहीतरी असेल, तर कशाला पाहायचं ते प्रदर्शन? हे प्रश्न साहजिक आहेत, पण त्या दोन्हीचं उत्तर : ‘तरीही अभिव्यक्तीच्या विविध तऱ्हा पाहून घेण्यासाठी या प्रदर्शनाला जावंच!’ असं आहे.
हे प्रदर्शन भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई उद्यानातल्या, मुंबई महापालिकेच्या ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’च्या परसात भरलं आहे. ते पाहताना उन्हाचा फार त्रास होत नाही, कारण इथं भरपूर झाडं आहेत! ‘माझं आत्मवृत्त, माझ्या स्मृती’ असाच या प्रदर्शनाचा विषय. जगभरातून प्रवेशिका मागवून (पण बक्षीस न ठेवता) हे प्रदर्शन भरवलं गेलं आहे. त्यामुळे मुंबईची आशिता मजुमदार-गणात्रा, स्पेनचा रॅकेल ब्राव्हो इग्लेशियस, बांगलादेशचे माहताब नफीस, इटलीच्या सारा पामेरी, पोलंडच्या वेरोनिका पेस्लरेव्हा आदी किमान १३ देशांतल्या १८ फोटोग्राफरांचे प्रत्येकी किमान चार ते पाच फोटो, अशी मिनी-प्रदर्शनंच इथं भरली आहेत. हे प्रदर्शन म्हणजे मुंबईत सध्या सुरू असलेल्या ‘फोकस फोटो फेस्टिव्हल’चं मध्यवर्ती प्रदर्शन. फोटोंच्या या ‘फेस्टिव्हल’चा भाग म्हणून मुंबईत अन्य अनेक गॅलऱ्यांत किंवा काही फॅशन स्टुडिओ आणि कॅफेंमध्ये सुद्धा मोठी/छोटी फोटोग्राफी प्रदर्शनं भरलेली आहेतच. त्यांची माहिती ‘फोकसफेस्टिव्हलमुंबई.कॉम’ या संकेतस्थळावर मिळेलच. पण हे प्रदर्शन म्हणजे फोटोग्राफीत अगदी आत्मनिष्ठ अभिव्यक्तीसुद्धा किती निरनिराळ्या प्रकारची असू शकते, याचा वस्तुपाठ आहे.
माहताब नफीसनं बांगलादेशात भरदिवसा विरोधकांचे खून होतात, त्याबद्दलचे फोटो मांडले आहेत. तर वेरोनिका पेस्लरेव्हा यांचा विषय ‘सासूबाईंनी जमवलेल्या वस्तूंच्या पसाऱ्यात मी’ असा- म्हटलं तर अगदी साधा- आहे. या सासूबाईंनी अगदी मध्यमवर्गीय पर्यटक महिला करतात तशीच घासाघीस वगैरे करून, पण जगभरातून कुठून कुठून काहीबाही वस्तू छान वाटल्या म्हणून आयुष्यभर खरीदल्या होत्या. त्या वस्तूंना ना ‘अँटीक’चं महत्त्व ना ‘लोककले’चा संदर्भ. पण तरीही जगभरची संस्कृती आणि त्या-त्या वेळची अभिरुची दाखवणाऱ्या त्या वस्तू होत्या! त्यांच्या पसाऱ्यातून काही वस्तू निवडून, त्यांची योजनापूर्वक मांडणी करून आणि त्या मांडणीत स्वतलादेखील ‘ठेवून’ वेरोनिका यांनी फोटो-संकल्पन केलं आहे. म्हणजे इथं हे फोटो त्यांनी स्वत ‘टिपलेले’ नसतील, पण कॅमेऱ्याची कळ दाबण्याऐवजी त्यांनी कॅमेऱ्याला कोणतं दृश्य दिसावं याची आखणी केलेली आहे म्हणून त्या ‘फोटो-संकल्पक’ (किंवा छायाचित्र-दिग्दर्शक) या अर्थानं फोटोग्राफर ठरतात. याखेरीज अर्थात अनेक फोटोग्राफरांबद्दल काही ना काही लिहिण्यासारखं आहे. एका महिला फोटोग्राफरनं ‘सैनिकी प्रशिक्षणातल्या माझ्यासोबतच्या मुली’ हा विषय मांडताना मुलींमधली क्रौर्याची आवडही दाखवली आहे. किंवा आणखी कुणी, बालपणासोबत मी निसर्गातलं कायकाय गमावलं हे मांडलं आहे. अशा वैविध्यपूर्ण अभिव्यक्तीत मध्येच जरी ‘फिजीतलं माझं घर’ असा विषय आला तरी त्यातून त्या देशाची सामाजिक-सांस्कृतिक स्थिती दिसत राहाते.
जहांगीर’मधले तरुण
महेश जगताप या ‘मुंबईच्या अमूर्तकला शैली’चा वारसा पुढे चालवणाऱ्या चित्रकाराचं प्रदर्शन सध्या ‘जहांगीर’मध्ये सुरू आहे. जगताप यांची चित्रं आधी एकरंगी भासतील, पण या रंगपडद्यातून अनेक आकार, अनेक रंगही नंतर दिसू लागतील. जगताप यांचं प्रदर्शन दुसऱ्या- तुलनेनं मोठय़ा दालनात आहे, तर त्याआधीच्या पहिल्या दालनात यज्ञेश शिरवाडकर यांनी ‘संगीतकार’ या विषयावर केलेली चित्रं आहेत. एखादी प्रतिमा फोटोशॉपमध्ये ‘बर्न’ केल्यावर जशी दिसते, तशी वापरून ओळखीच्या चेहऱ्यांकडे वा दृश्यांकडे पुन्हा पाहायला लावण्याची खासियत या चित्रांत आहे. याच दालनाच्या तिसऱ्या भागात पूर्णेन्दु मोंडल यांच्या शहरदृश्यांचं प्रदर्शन सुरू आहे. तर ‘जहांगीर’च्याच सभागृह दालनात मंगेश कापसे, नितीन योगी, अमृता शांभरकर आदी तरुण चित्रकारांचं समूहप्रदर्शन भरलं आहे. याच प्रदर्शनात यंदाच्या ‘कोची बिएनाले’मध्ये तब्बल ४० हून अधिक मुद्राचित्रं प्रदर्शित करणारा गुणी मुद्राचित्रकार सुब्रत बेहेरा याचाही असलेला समावेश, ही आणखी एक जमेची बाजू!
‘फुकुशिमा’नंतर..
जपानमधल्या सुनामीनं फुकुशिमा अणुभट्टी उद्ध्वस्त झाली, किरणोत्सारही झाला. या संहारातून सावरताना लोक कसे जगले? याचं उत्तर फोटोंमधून देणारं आणखी एक प्रदर्शन ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’च्याच मागल्या बाजूच्या बैठय़ा गॅलरीत लागलं आहे. अनेक फुकुशिमावासी हे किरणोत्साराचा परिणाम मोजणाऱ्या पथकांमध्ये (किरणोत्सार प्रतिबंधक पोषाख घालूनच) सहभागी झाले होते. तर संहारातून समुद्रकाठी आलेल्या अनेक मोडक्यातोडक्या वस्तूंची कुणी राखण्या-खांबासारखी शिल्पं बनवली होती! जीवन थांबत नाही, हेच या प्रदर्शनातून दिसतं.