मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील तपास अधिकाऱ्यांसह दहशतवाद्यांचे शवविच्छेदन करणारे डॉक्टर तसेच अजमल कसाबचा कबुलीजबाब नोंदविणाऱ्या महादंडाधिकाऱ्यांची उलटतपासणी करण्याची परवानगी मिळालेल्या पाकिस्तानी न्यायालयीन आयोगाला आता दहशतवाद्यांचे मोबाईल आणि त्यांनी हल्ल्यादरम्यान वापरलेले साहित्य तपासायचे आहेत. तशी मागणी त्यांनी मंगळवारी मुंबईच्या न्यायालयाकडे केली.
कसाबचा कबुलीजबाब नोंदविणारे महादंडाधिकारी आर. व्ही. सावंत वाघुले, तपास अधिकारी रमेश महाले आणि शवविच्छेदन करणारे डॉक्टर यांच्या उलटतपासणीची परवानगी मिळाल्यानंतर आठ सदस्यांचे पाकिस्तानी न्यायालयीन आयोग मुंबईत दाखल झाले आहे. मंगळवारी दहशतवाद्यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची ते उलटतपासणी करणार होते. मात्र त्यांनी ती घेतली नाही, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने या प्रक्रियेत उपस्थित असलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मात्र आयोगाने दहशतवाद्यांचे मोबाईल आणि त्यांनी वापरलेले साहित्य यांची तपासणी करू देण्याची परवानगी मागितली. त्यानंतर या विशेष सुनावणीचे कामकाज पाहणारे महादंडाधिकारी पी. वाय. लाडेकर यांनी निकम यांनी पाकिस्तानी न्यायालयीन आयोगाच्या मागणीला आक्षेप न घेतल्याने हे साहित्य बुधवारी सादर करण्याचे आदेश दिले. या साहित्यामध्ये दहशतवाद्यांच्या मोबाईलसह डिंगी, यामाहा मशीन, जीपीएस डिव्हाईस आदी साहित्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने आयोगाच्या या मागणीविषयी आश्चर्य व्यक्त करीत साहित्य तपासण्याबाबत आधीच का कळविले नाही, अशी विचारणा केली. बुधवारी महादंडाधिकारी वाघुले आणि महाले यांची आयोगाकडून उलट तपासणी घेण्याची शक्यता आहे.

Story img Loader