पालघर विधानसभा पोटनिवडणूक लढवायची किंवा नाही, याचा निर्णय प्रदेश सुकाणू समितीच्या बैठकीत घेतला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
पालघरमध्ये शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २७ जून रोजी निवडणूक होणार आहे. याआधी वांद्रे (पूर्व) येथून बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानंतर त्या जागी भाजपने उमेदवार उभा केला नव्हता. मुखेडला भाजपसाठी शिवसेनेने निवडणूक लढविली नव्हती. भाजप किंवा शिवसेनेच्या विद्यमान आमदाराचे निधन झाल्यास किंवा काही कारणाने जागा रिक्त झाल्यास त्याच पक्षाने निवडणूक लढवावी आणि दुसऱ्या पक्षाने उमेदवार देऊ नये, असे सूत्र ठरल्याचा शिवसेनेचा दावा आहे. मात्र भाजप नेते त्यास दुजोरा देण्यास तयार नाहीत.  विधानसभा निवडणुकीत हरलेल्या प्रत्येक जागेवर भाजपची ताकद वाढवावी, असे आवाहन अध्यक्ष अमित शहा यांनी कोल्हापूर येथे प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत केले होते. त्यामुळे भाजपने महासंपर्क अभियान आणि अन्य माध्यमातून पक्षाची ताकद वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपकडून ही निवडणूक लढवावी का, याची चाचपणी सुरु आहे. शिवसेना सरकारमध्ये असल्याने भाजपने ही निवडणूक लढविल्यास स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा