पालघर, सिंदखेडराजा आणि लोणार या तीन नगरपालिकांसह ५६४ ग्रामपंचायतीच्या तसेच ठाणे, उल्हासनगर महापालिकांच्या पोटनिवडणुका येत्या २३ मार्च रोजी होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी याची घोषणा केली.
या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४ ते ८ मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून १० मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख १२ मार्च आहे. नगरपरिषद निवडणुकांसाठी २१ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून १ मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे.
उल्हासनगर, सोलापूर व नवी मुंबई या महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका प्रभागातील रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी व ठाणे महानगरपालिकेच्या चार रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी २५ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील.
जामनेर (जि. जळगाव), अकोले (जि.अहमदनगर), अक्कलकुवा (जि.नंदूरबार), अहमदपूर (जि.लातूर) आणि पोंभुर्णा (जि.चंद्रपूर) या पंचायत समित्यांमधील प्रत्येकी एका निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ ते ७ मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका होणाऱ्या वरील सर्व ठिकाणी २३ मार्च रोजी मतदान होणार असून २४ मार्च रोजी मतमोजणी होईल.

Story img Loader