संदीप आचार्य

वडिलांच्या वेदना पाहणे अशक्य होते. एकीकडे कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना होत असलेल्या यातना, तर दुसरीकडे आईसह कुटुंबातील अन्य सदस्यांची मानसिक अवस्था या कात्रित आम्ही सापडलो असताना ‘रोमिला पॅलेटिव्ह केअर’च्या डॉक्टरांनी मदतीचा हात दिला. वेदनाशामक औषधे वडिलांना देण्याबरोबरच कुटुंबातील सर्वांना जो मानसिक आधार दिला, तो शब्दात व्यक्त करणे शक्य नाही, हे तीशीतील आनंदचे उद््गार पुरेसे बोलके आहेत. कर्करोगासारख्या दुर्धर आजारात शेवटच्या टप्प्यातील रुग्णांच्या वेदना कमी करण्याबरोबरच कुटुंबातील सदस्यांना मानसिक आधार देण्यासाठी ‘पॅलेटिव्ह केअर’ची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आपल्या चारही प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयात दुर्धर आजाराच्या रुग्णांच्या वेदनांवर उपचाराची फुंकर घालण्यासाठी पॅलेटिव्ह केअर संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या केईएम, शीव, नायर व कुपर रुग्णालयात पहिल्या टप्प्यात बाह्यरुग्ण विभागाच्या माध्यमातून कर्करोगासह दुर्धर आजाराच्या रुग्णांना उपशाम देणारी ही पॅलेटिव्ह केअर योजना राबविण्यात येणार असून यात प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका व मानसोपचारतज्ज्ञांच्या माध्यमातून रुग्णांबरोबरच आवश्यकतेनुसार कुटुंबातील सदस्यांना मानसिक आधार देण्याचे कामही केले जाणार आहे. ही योजना राबविण्यासाठी ‘सिप्ला फाऊंडेशन’चे संपूर्ण सहकार्य मिळणार असून याबाबत येत्या शनिवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चारही वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, रमोला पॅलेटिव्ह केअर व स्नेहा संस्थेच्या प्रमुख, तसेच शीव रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. अर्मिडा फर्नांडिस आदींची बैठक होणार आहे.

डॉ. अर्मिडा फर्नांडिस या विख्यात बालरोगतज्त्र (निओनेटॉलॉजीस्ट) असून त्यांची कन्या रोमिला हिचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर तिच्या नावे डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांनी रमोला पॅलेटिव्ह केअर संस्था स्थापन करून कर्करोग तसेच तत्सम दुर्धर आजाराच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णांना सर्वार्थाने मदत करण्यास सुरुवात केली. आज वयाच्या ८० व्या वर्षी डॉ. अर्मिडा व त्याचे पती हे दुर्धर आजाराच्या रुग्णांची सेवा त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून करत असून २०१७ पासून आतापर्यंत १८०० हून अधिक रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. तर सात हजारांहून अधिक रुग्णांच्या घरी जाऊन या रुग्णांना व नातेवाईकांना आधार दिला आहे. ‘स्नेहा’ संस्थेच्या माध्यमातून रोमिला पॅलेटिव्ह केअर संस्थेने जवळपास चार हजारांहून अधिकजणांना प्रशिक्षित केले आहे. तसेच जनजागृती कार्यक्रम राबविले आहेत.

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय व सलग्न रुग्णालयांच्या माध्यमातून ही योजना राबवावी म्हणून डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची भेट घेतली असता त्यांनाही या योजनेला सर्वार्थाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. याबाबत डॉ. संजीवकुमार यांना विचारले असता, दुर्धर आजाराच्या रुग्णांची संख्या खूप मोठी असून अशा रुग्णांना मदत मिळण्याची गरज आहे. त्यांच्या वेदना कमी करण्याबरोबरच कुटुंबातील व्यक्तींना सर्वार्थाने मानसिक, तसेच अन्य आधार मिळण्याची आवश्यकता असून आम्ही चारही महापालिका वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या टप्प्यात बाह्यरुग्ण विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेच्या एखाद्या रुग्णालयात रुग्ण दाखल करून उपचार करण्यात येणार असल्याचे डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले.

मुंबईत गोवरचा १२ वा मृत्यू; गोवरचे १३ नवे तर १५६ संशयित रुग्ण आढळले

महापालिकेला हा उपक्रम राबविण्यासाठी ‘सिप्ला फाऊंडेशन’ने आम्हाला आर्थिक व अन्य सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. १९९७ मध्ये स्थापन झालेल्या सिप्ला फाऊंडेशन या पुणे स्थित संस्थेने आतापर्यंत २० हजारांहून अधिक रुग्णांना मोफत मदतीचा हात दिला आहे. तसेच या क्षेत्रात अनेक प्रशिक्षण कार्यक्रम राबवले आहेत. एकूणच मुंबई व परिसरातील दुर्धर आजाराच्या रुग्णांचा आढावा घेऊन या योजनेची व्याप्ती वाढवली जाईल, असेही डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले.

आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कर्करोग, एचआयव्हीबाधित तसेच अन्य दुर्धर आजार झालेल्या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष उपचारांची (पॅलेटिव्ह केअर) आवश्यकता असते. अशा रुग्णांची काळजी घेणे अनेक वेळा घरच्यांनाही शक्य होत नाही. या रुग्णांना वेदना कमी करण्यासाठी मॉर्फिनची इंजेक्शन्स देण्यासह विशेष काळजी घ्यावी लागते. गोरगरीब रुग्णांना यासाठी येणारा खर्च परवडणारा नसतो, तसेच काळजी घेणेही शक्य होत नाही हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांनी सांगितले.

पॅलेटिव्ह केअर हे वैद्यकीय शास्त्रातील असे क्षेत्र आहे जे केवळ दुर्धर आजारांवर उपचार करत नाही तर वेदनांपासून रुग्णाला आराम मिळवून देण्याबरोबरच मानसिक वेदना कमी करण्यासही मदत करते. यासाठी विशेष प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी यांची आवश्यकता असून त्याचाही विचार महापालिकेच्या माध्यमातून ही योजना राबिवताना केला जाणार असल्याचे डॉ. फर्नांडिस म्हणाल्या. दुर्धर आजाराच्या लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच त्यांच्या पालकांच्या मानसिक ताणतणावाचाही विचार करून त्यांनाही आधार द्यावा लागतो. अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार तसेच सर्व अधिष्ठात्यांनी मोलाचे सहकार्य केले असून त्यांच्या सहकार्यातूनच दुर्धर आजाराच्या हजारो रुग्णांच्या वेदनांवर उपचाराच्या मदतीची फुंकर घातली जाणार असल्याचे डॉ. फर्नांडिस यांनी सांगितले.