पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांमध्ये घबराट निर्माण करण्यासाठी वारीमध्ये साप सोडण्याचा कट रचण्यात आला होता असा खळबळजनक दावा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. बडया नेत्यांनी वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट रचला होता.  बडया नेत्यांचे फोनवरील संभाषण आमच्या हाती लागलं आहे असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी ही खळबळजनक माहिती दिली.

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षण हा आमच्यासाठी राजकीय अजेंडयाचा विषय नसून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणावर आधीच्या सरकारने फक्त अध्यादेश काढला होता पण तो अध्यादेश फेटाळला गेला म्हणून आम्ही कायदा केला पण कायदाही कोर्टात टिकला नाही. म्हणून आम्ही मागासवर्ग आयोगाची स्थापना केली असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबींवर सरकारकडून अभ्यास सुरु आहे. आमच्या कार्यकाळात नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा दावा त्यांनी केला.

Story img Loader