सुरेलपणा, लयकारी ही पंडित डी. के. दातार यांच्या व्हायोलियनवादनाची वैशिटय़े असून आजवर ऐकलेल्या अनेक व्हायोलिनवादकांमध्ये दातार यांच्या वादनातील सुरांचा सच्चेपणा हा सर्वापेक्षा उजवा होता, असे गौरवोद्गार विख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी दातार यांच्या सत्कार समारंभात काढले.
गायनाशी नाते आणि इमान ठेवणाऱ्या वादनशैलीसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ व्हायोलिनवादक पद्मश्री पंडित डी. के. दातार यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केल्याबद्दल दादर येथील सावरकर स्मारकात त्यांचा सत्कार झाला. महापौर सुनील प्रभू व चौरसिया यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि चांदीचा गणपती देऊन दातार यांचा सत्कार करण्यात आला. दातार यांच्या पत्नी सुधा दातार यांचाही यावेळी सत्कार झाला.
दातार यांच्याशी गेल्या ५० वर्षांचे संबंध आहेत. अनेक ठिकाणी आम्ही एकत्र काम केले. अनेकदा त्यांचे व्हायोलिन व माझी बासरी अशी जुगलबंदीही रंगली, असे सांगत चौरसिया यांनी जुन्या आठवणींना उजळा दिला. गुरू विघ्नेश्वर शास्त्री, डी. व्ही. पलुस्कर, बापूराव व मधुकर दातार यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे आजवरचा प्रवास सुखकर झाला. आता अनेक शिष्य व्हायोलिनवादनाची परंपरा जपत आहेत, त्यांनी ती अशीच पुढे सुरू ठेवावी आणि तिचा प्रसार करावा, अशी भावना सत्काराला उत्तर देताना डी. के. दातार यांनी व्यक्त केली.
प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांनी गायलेल्या ‘श्री’ रागाने ही सूरमयी संध्याकाळ रंगण्यास सुरुवात झाली. नंतर मिलिंद रायकर, राजन माशेलकर व रत्नाकर गोखले या पंडित दातार यांच्या तीन शिष्यांनी व्हायोलिनवर राग ‘हंसध्वनी’ एकत्रितपणे सादर करत आपल्या गुरूला सुरेल मानवंदना दिली. त्यांना जयेश रेगे यांनी तबल्यावर साथ केली. डॉ. निखिल दातार यांनी पिता दातार यांचे तर माशेलकर यांनी गुरू दातार यांचे व्यक्तिमत्त्व रसिकांपुढे उलगडले. दातार यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारी ‘सुरेल ८०’ ही ध्वनीचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. पंडित दातारांच्या सत्कार सोहळय़ासाठी त्यांच्या चाहत्यांची व संगीतप्रेमींची मोठी गर्दी झाली होती.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा