मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ‘शिवचरित्र – एक सोनेरी पान’ या गीताचे लोकार्पण ज्येष्ठ गायक-संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात करण्यात आले. यावेळी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देताना आज माझ्याबरोबर दीदी नाही, तिची उणीव नेहमी भासते, असे भावोद्गार ह्रदयनाथ मंगेशकर यांनी काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. दीपक वझे यांनी लिहिलेले, गायक व संगीतकार रुपकुमार राठोड यांनी संगीतबध्द केलेले आणि गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी गायलेल्या ‘शिवचरित्र – एक सोनेरी पान’ या गीताचे लोकार्पण बुधवारी, सांताक्रुझ येथील आजिवसन हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्यासह ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, आदिनाथ मंगेशकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि ज्येष्ठ गायक नितीन मुकेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आदिनाथ मंगेशकर यांची संकल्पना व मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या गीताचे संगीत संयोजन मणी अय्यर यांनी केले आहे. तर प्रसिध्द गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी यानिमित्ताने पहिल्यांदाच मराठीत गीतगायन केले आहे.

हेही वाचा…कोकण रेल्वेच्या टप्पा दुहेरीकरणाला वेग, प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपूर्द

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांपैकी एक असलेल्या ‘साधी माणसं’ या चित्रपटातील ‘नको देवराया अंत आता पाहू’ या गाण्याची आठवण जागवताना २२ व्या वर्षी संगीतबध्द केलेल्या या गाण्याचा अचूक अर्थ आज दीदी गेल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने उमगला आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…शंभर टक्के नालेसफाईचा दावा खोटा, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप; वडाळा, ॲंटॉप हिल परिसरातील नाले कचऱ्याने तुडूंब

लता आणि उषा या दोन्ही भगिनींना घेऊन आग्र्यात फिरायला गेल्यानंतर ताजमहालला दिलेल्या भेटीचा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला. ‘ताजमहलमध्ये फिरत असताना मी दीदीला ‘कहीं दीप जले कहीं दिल’ हे गाणे गायला सांगितले. ती गात असतानाच तिथे मौलवी साहेब धावत आले आणि इथे तुम्ही गाऊ शकत नाही, असे सांगणार तेवढ्यात त्यांची नजर दीदीकडे गेली. तुमचा आवाज साक्षात अल्लाहचा आवाज आहे. तुम्हाला थांबवणारा मी कोणी नाही, असे म्हणत त्या मौलवींनी दीदींची माफी मागितली आणि गाणे पूर्ण करण्याचा आग्रह केला. त्यादिवशी माझ्या मते पहिल्यांदा ताजमहल या वास्तूत गीत गायले गेले’ अशी आठवण ह्रदयनाथ मंगेशकर यांनी सांगितली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबरोबर झालेली पहिली भेट, ‘सागरा प्राण तळमळला’ या गाण्याची आठवण असे किस्से सांगणाऱ्या ह्रदयनाथ मंगेशकर यांनी समर्थ रामदास स्वामी रचित शिवस्तुती सादर करत या कार्यक्रमाचा समारोप केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandit hridaynath mangeshkar launches shivacharitra ek soneri paan song on 350th shivrajyabhishek day mumbai print news psg