जलसंपदा खात्यातील मनमानी कारभार
राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांतील घोटाळ्यांनी राजकारण ढवळून निघाले असतानाच राजकारणी, कंत्राटदारांच्या दादागिरीला कंटाळून गेलेल्या या विभागातील सचिवांसह १७ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून घरचा रस्ता धरला आहे. सिंचन क्षेत्राचे अंतरंग उघडे करून राजकीय भूकंप घडवून आणणारे मुख्य अभियंता विजय पांढरे हे स्वेच्छानिवृत्ती घेऊन सरकारच्या सेवेतून बाहेर पडणारे १८ वे अधिकारी आहेत. सध्या गाजत असलेल्या व भ्रष्टाचारामुळे वादग्रस्त ठरलेल्या विदर्भ विकास महामंडळातील अधिकाऱ्यांची संख्या स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांमध्ये मोठी आहे. राज्याच्या प्रशासनापुढे चिंता निर्माण करणारी ही धक्कादायक माहिती ‘लोकसत्ता’ने माहिती अधिकाराद्वारे मिळविली आहे.
राज्यातील जलसंपदा विभाग सध्या भ्रष्टाचाराच्या मालिकांमुळे व मनमानी कारभाराच्या नवनव्या कहाण्यांनी गाजत आहे. हा विभाग मंत्री, अधिकारी की कंत्राटदार चालवितात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही कंत्राटदारांचे पत्र एका विभागात पोहोचण्याच्या आधीच दुसऱ्या विभागात त्याची फाईल तयार होते व सह्य़ांसाठी ती तोऱ्यात फिरत राहते. ही कंत्राटदारांची मुजोरी अनेक अधिकाऱ्यांना खटकत आहे. या विभागात काही चांगले अधिकारीही आहेत, परंतु राजकारणी व कंत्राटदारांच्या जाचाला कंटाळून अनेक अधिकाऱ्यांनी नोकऱ्या सोडून घरी जाणे पसंत केले आहे. त्यात एक सचिव, एक कार्यकारी संचालक, दोन मुख्य अभियंते व १२ कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सरकारी खात्यात वरच्या जागांसाठी मारामारी सुरू असते. तरीही काही अधिकाऱ्यांनी मोक्याच्या व ‘माऱ्या’च्या जागा सोडून घरचा रस्ता धरला आहे. जलसंपदा विभागातील गेल्या दोन वर्षांत कार्यकारी अभियंते, अधीक्षक अभियंते, मुख्य अभियंते, सचिव व प्रधान सचिव स्तरावरील किती अधिकाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीबाबतची ही माहिती चिंताजनक व धक्कादायक आहे.
जलसंपदा विभागाचे सचिव चं. स. मोडक यांनी एक वर्ष सेवा बाकी असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्याच दर्जाचे व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ह. य. कोळवले हे आठ महिने अगोदरच नोकरीतून बाहेर पडले.
कोयना प्रकल्पाचे साहाय्यक मुख्य अभियंता भा. चि. जोशी यांनी पाच महिने आधी स्वेच्छानिवृत्ती घेतली. कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे उप अधीक्षक न. वि. रावळ यांनी तीन वर्षे बाकी असताना सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त का. चि. कापरे, ना. भा. घुगे (गोसीखुर्द प्रकल्प), अरविंदकुमार दत्त (वर्धा पाटबंधारे प्रकल्प), सु. शे. गोहत्रे, आ.पा. काळुखे, शि.ग. शिंदे, शि.मा. गोवंडे, नं. दि. काटे, भा.तु. कुलकर्णी, अ.अ. जोशी (गोसी खुर्द प्रकल्प), ना.स. जाधव व म्हा.रा. मेटकरी या कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे.  स्वेच्छानिवृत्तीसाठी या अधिकाऱ्यांनी दिलेली कारणे ‘व्यक्तिगत’, ‘कौटुंबिक’ अशी असली तरी राजकारणी, कंत्राटदार आणि काही अधिकारी यांच्या अभद्र युतीत भरडल्यानेच हे अधिकारी बाहेर पडल्याची चर्चा खात्यात सुरू आहे.

Story img Loader