अतिरिक्त शुल्क वसुली, प्रवेशांमधील अपारदर्शकता आदी संदर्भात अमरावतीच्या ‘श्री शिवाजी शिक्षण संस्थे’च्या ‘डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालया’ची चौकशी करण्याचे आदेश देऊन चार महिने झाले तरीही त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.
या महाविद्यालयाविरोधात वैद्यकीय शिक्षण विभागाकडे विद्यार्थी, आमदार व इतर व्यक्तींनी तक्रारी केल्या होत्या. त्यांची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले होते. त्यानुसार विभागाने जुलै, २०१३ मध्ये वैद्यकीय शिक्षण शिक्षण संचालनालयाला अधिष्ठात्यांमार्फत संबंधित महाविद्यालयाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. तक्रारींमधील गांभीर्य पाहता संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संचालक डॉ. प्रविण शिनगारे यांनी दिले होते.
संचालनालयाने यवतमाळच्या अधिष्ठात्यांची समिती चौकशीसाठी नेमली. संबंधित अधिष्ठातांनी सप्टेंबर महिन्यात संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन चौकशीही केली. मात्र, चौकशीचा अहवाल अद्याप संचालनालयाला सादर केलेला नाही. चौकशी पूर्ण होऊन दोन महिने झाले तरी अहवाल का दिला गेला नाही, असा सवाल महाविद्यालयाचे माजी उपाध्यक्ष आणि एक तक्रारदार दिलीप इंगोले यांनी केला.
महाविद्यालयाविरोधातील तक्रारी
* २०११-१२चे प्रवेश करताना पारदर्शकता ठेवली नाही. आरक्षणाचे नियम पाळले नाहीत
* एनआरआय कोटय़ाचे प्रवेश नियम धुडकावून. कॅपिटेशन फी घेतली
* सरकारच्या सक्षमता तपासणी समितीला खोटी आंतररूग्ण व बाह्य़रूग्ण संख्या दाखविली