विशेष न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट
महाराष्ट्र सदन घोटाळ्यासह कोटय़वधींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हेही अडचणीत आले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायालयाने बुधवारी पंकज यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले असून तेही गोत्यात आले आहेत.
छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) दाखल केलेल्या आरोपपत्रातील पंकज यांच्यासह अन्य ३४ आरोपींच्या नावेही विशेष न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश पी. आर. भावके यांनी अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. आरोपी सहकार्य करत नसल्याची तक्रार केल्यानंतर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने ‘ईडी’ला दिले होते.
भुजबळ कुटुंबीयांना ‘मोक्का’ लावण्याची मागणी
भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वरूप हे संघटित गुन्हेगारी असून त्यांच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विनोद गंगवाल यांनी बुधवारी विशेष न्यायालयाकडे केली. मात्र ‘पीएमएलए’नुसार स्थापन करण्यात आलेले हे विशेष न्यायालय असून भुजबळ कुटुंबीयांवर याच कायद्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे ‘मोक्का’ लावण्याची मागणी या न्यायालयाकडे करता येऊ शकत नाही, असा दावा करत ‘ईडी’तर्फे मागणीला विरोध करण्यात आला. तसेच अर्जदाराने संबंधित न्यायालयाकडे तशी मागणी करावी, असेही सुचवण्यात आले. न्यायालयाने या अर्जावरील निर्णय ११ मेपर्यंत राखून ठेवला आहे.