ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या खासगी आमंत्रणावरून सिंगापूर येथे पाणी परिषदेसाठी गेल्या असून केंद्र सरकारची परवानगी देखील घेतली नसल्याने हा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. ही परिषद फारशी महत्त्वाची नसल्याने केंद्र सरकारने आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा काही राज्यांच्या मंत्र्यांना येथे जाण्यास परवनागी नाकारली असल्याचे समजते. मात्र तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथे हजर राहण्याचे आदेश का दिले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जलसंधारण खाते काढून घेतल्याने पंकजा मुंडे यांनी परिषदेत हजर न राहण्याचा निर्णय ट्विटरवरून जाहीर केला. त्यांनी नाराजीमुळे हे पाऊल उचलल्याचे वाटल्याने मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरूनच त्यांना राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता पंकजा मुंडे यांनीच जलसंधारण खाते काढल्याने आपण नाराज नसल्याचे स्पष्ट करताना हा दौरा शासकीय नसल्याचे सांगितले आहे. आपले जलसंधारणाचे काम पाहूनच सिंगापूर येथून निमंत्रण आल्याने येथे उपस्थित राहत असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.राज्यातील कोणत्याही मंत्र्याला परदेश दौऱ्याला जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, मुंडे ही परवानगी घेतली आहे किंवा नाही याबाबत माहिती नसल्याचे  उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

 

 

Story img Loader