Corona Omicron infection to Pankaja Munde : माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग झाला आहे. यावेळी त्यांना करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणं आहेत. सध्या त्या आपल्या मुंबईतील घरीच क्वारंटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पंकजा मुंडे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, “करोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे. चाचणी केली. लक्षणं आणि करोना दोन्ही आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी.”
राज्यात आज ९ हजार १७० नवीन करोनाबाधित आढळले
राज्यातील करोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या रूग्णांची संख्या ही मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे. शिवाय, ओमायक्रॉनचे रूग्ण देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कडक पावलं उचलली जात असून, निर्बंध अधिक कठोर केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज दिवसभरात राज्यात ९ हजार १७० नवीन करोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे. तर, मुंबईत ६ हजार ३४७ नव्या करोनाबाधितांची आज नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात आज सात करोनाबाधित रूग्णांचा तर मुंबईत एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.
तर, आज राज्यात १ हजार ४४५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१०,५४१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिक्व्हरी रेट ) ९७.३५ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज रोजी एकूण ३२,२२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,८७,९९१ झाली आहे. आजपर्यंत राज्या १४१५३३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९१,३६,६४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,८७,९९१ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२६,००१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा : लोकसत्ता विश्लेषण : ‘जिनोम सिक्वेंसिंग’ काय आहे? ओमायक्रॉनसह करोनाच्या इतर विषाणूंची चाचणी कशी करतात?
मुंबईत आज ४५१ रूग्ण करोनामुक्त झाले, सध्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या २२ हजार ३३४ आहे. तर, एकूण ७५०१५८ जण आतापर्यंत बरे झाले आहेत. काल मुंबईत ५ हजार ६३१ करोनाबाधित आढळले होते.