मुंबई : भाजपचे आमदार सुरेश धस हे जाहीर टीका-टिप्पणी करीत असल्याने त्यांना समज देण्याची विनंती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे. तर मीही पंकजा मुंडे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे आणि फडणवीस व बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे प्रत्युत्तर धस यांनी दिले आहे. त्यामुळे भाजपमधील दोन ज्येष्ठ नेते व आमदारांमध्येच कलगीतुरा रंगला आहे.
‘विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून गेले पाच-सहा महिने मी गप्प बसले होते. पण माझा उल्लेख करून धस हे वैयक्तिक टीका करीत आहेत. निवडणुकीत ७५ हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाल्यावर लगेचच मी त्यांचा प्रचार केला नसल्याचा आरोप धस यांनी केला. हे चुकीचे आहे. मी जर प्रचार केला नसता, तर एवढे मताधिक्य घेऊन निवडून येता आले असते का? मी भाजपच्या सर्व उमेदवारांचा प्रचार केला आहे. उलट मलाच लोकसभा निवडणुकीत आधीपेक्षा कमी मताधिक्य मिळाले. पण धस यांनी निवडणुकीत माझे काम केले नाही, असा आरोप मी केला नाही, असेही, मुंडे म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीत अनेकांनी माझे काम केले नव्हते. पण मी गप्प राहून परिस्थितीवर मात केली. धस यांची टीकाटिप्पणी पक्षाचे वरिष्ठ नेते व पक्षाच्या शिस्तीला मान्य होणारी नाही. त्यामुळे त्यांना समज देण्याची विनंती मी पक्षश्रेष्ठींना केली असल्याचे मुंडे यांनी पत्रकारांना सांगितले.
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मी तेवत ठेवले. देशमुख हा भाजपचा मतदान केंद्रप्रमुख होता. त्याच्या आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत मी शांत बसणार नाही, असे सुरेश धस यांनी नमूद केले.