मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, दोन समाजांमध्ये निर्माण झालेली तेढ, एका समाजाला करण्यात येणारे लक्ष्य यामुळे आपण अस्वस्थ असून बीडमधील या साऱ्या घटना म्हणजे नैतिकतेची हत्या असल्याचे परखड मत ज्येष्ठ भाजप नेत्या आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी नोंदविले. सोमवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात त्यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर मनमोकळे भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरपंच हत्या प्रकरण, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप, जातींमध्ये उफाळून आलेला संघर्ष, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड, गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील व आजचा भाजप अशा अनेक विषयांवर पंकजा मुंडे यांनी आपली मते मांडली. ‘‘देशमुख भाजपचे कार्यकर्ते आणि माझे मतदान केंद्रप्रमुख होते. त्यांचा बिचाऱ्यांचा जीव गेला, कुटुंबावर मोठा आघात झाला. त्यानंतर एका समाजाला किंवा जातीला गुन्हेगार ठरविले गेले. पण त्यातून काय साधायचे आहे? नांदेड, पुण्यातही हत्या झाली, पण त्यानंतर असे वातावरण तयार झाले नाही. ही एक नैतिकतेची लढाई आहे. सत्ता सहजपणे माज आणते व व्यक्तीला अहंकार देवून जाते. मी त्याला खतपाणी घालू शकत नाही.

काही वेळा कार्यकर्ते नेत्याला फशी पाडतात, तर काही वेळा मी पाहून घेईन, असे सांगून नेते कार्यकर्त्यांना मुभा देतात. पण देशमुख हत्याप्रकरणामुळे नैतिकतेला धक्का बसला आहे, गावागावांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सामाजिक तेढ केवळ मराठवाड्यातच नसून पश्चिम महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये आहे,’’ असे मुंडे म्हणाल्या. देशमुख यांची हत्या कोणी केली, हे न्यायालयात खटला उभा राहील, तेव्हा कळेल. पोलिसांच्या सांगण्यानुसार सर्व काही ठरत नाही. न्यायालयात साक्षीपुरावे पुढे येतात व निर्णय होतो. आता प्रसिद्धीमाध्यमे व समाजमाध्यमे वाढली आहे, आरोपांचे सत्र वाढले आहे. पोलिसांनी तपास केला असून हत्येमध्ये कोणाचा संबंध आहे, हे त्यांना व गृहखात्याला माहिती असेल.

धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घ्यायचा आहे व ते योग्य वेळी घेतील. ते निर्णय का घेत नाहीत, हे मी सांगू शकत नाही आणि विचारलेही नाही, अशी पुष्टी मुंडे यांनी जोडली. धनंजय मुंडे यांच्यावर पूर्वी आरोप झाले, तेव्हाही मी कुठल्याही गोष्टीचे समर्थन करणार नाही आणि ते आयुध किंवा शस्त्र म्हणून वापरणार नाही, असे सांगितले होते. कोणाचेही व्यक्तिगत जीवन हे राजकीय जीवन उध्वस्त करण्यासाठी वापरू नये. पण राजकीय नेत्यांनी आपले वैयक्तिक जीवन हे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

शासनाचा धाक असलाच पाहिजे

स्वारगेट एसटी स्थानकात मुलीवर बलात्कार, रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड या घटना अतिशय अनुचित आहेत. तरुण मुलांवर घराचा धाक राहिलेला नाही. शासन सर्व ठिकाणी लक्ष देऊ शकत नाही. राजकीय नेते, सेलिब्रेटी आणि सर्वसामान्य कुटुंबातील सर्व मुली सारख्याच व त्या सुरक्षितच असल्या पाहिजेत. जर नेत्यांच्या मुली सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न साहजिकच येतो. गुन्हेगारांवर शासनाचा धाक असलाच पाहिजे, असे मुंडे यांनी नमूद केले.

‘‘माझा भाजपमधील वरिष्ठ नेत्यांशी कधीही संघर्ष नव्हता.’’

‘‘माझ्या बोलण्याचा अनेकदा चुकीचा अर्थ लावला गेला.’’

(सविस्तर वृत्तांत रविवारच्या अंकात)