मुंबई : घाटकोपर येथील पंतनगर महानगरपालिका उच्च प्राथमिक हिंदी शाळेत इयत्ता पहिले ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन शिक्षिका अध्यापन करीत आहेत. त्यापैकी पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तरअंगणवाडी शिक्षिकेची नेमणूक करण्यात आली आहे. अध्यापनासाठी शैक्षणिक पात्रता पूर्ण नसतानाही या शिक्षिकेची नेमणूक केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे. पुरेसे व नियमित शिक्षक नसल्याने पालकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेतील अनके शिक्षक प्रतिनियुक्तीवर अन्य कार्यालयात काम करीत आहेत. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पालिकेच्या शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे.
पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत शाळेचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपाययोजना व उपक्रम राबविले जातात. मात्र, घाटकोपरमधील पंतनगर शाळेत गेल्या अनेक महिन्यांपासून पुरेशा आणि नियमित शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. आरटीई नियमानुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गात प्रत्येक २५ विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असणे अनिवार्य असते. मात्र, पंतनगर शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एकूण ९७ विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी शिक्षक नसल्याचे निदर्शनास आले आहे. अध्यापनासाठी शाळेत पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खुंटण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षकांच्या नेमणुकीबाबत शाळेने पालिकेच्या शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.
मात्र, अद्यापही शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे. गतवर्षी संबंधित शाळेत पहिली ते पाचवीसाठी ३ शिक्षक अध्यापन करत होते. त्यातील एका शिक्षिकेने स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असून जुलै २०२४ मध्येच त्याबाबत पालिकेच्या शिक्षण विभागाकडे अर्ज सादर केला आहे. मात्र, पालिकेने त्या शिक्षिकेचा अर्ज मंजूर केला नसल्याने संबंधित शिक्षिका अनेकदा शाळेत अनुपस्थित असते. दुसरी शिक्षिका २१ जानेवारीपासून बालसंगोपन रजेवर गेली आहे. त्यामुळे केवळ एकच शिक्षिका इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करीत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना चक्क अंगणवाडी शिक्षिका अध्यापन करीत आहे. एकाच वर्गात अंगणवाडी आणि पहिली ते तिसरीचे वर्ग भरविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापनात अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंतच्या अध्यापनासाठी शैक्षणिक अहर्ता नसतानाही अंगणवाडी शिक्षकेची नेमणूक केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होत असल्याची खंत पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
शिक्षकांची कमतरता, शिक्षणाचा ढासळलेला दर्जा, प्रशासनाची अनास्था आदींमुळे शाळेतील पटसंख्येलाही गळती लागली आहे. तसेच, शाळेत एकही शिपाई नसल्याने अन्य कामांचाही खोळंबा होत आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकेंशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.गेले अनेक महिने शिक्षकांच्या नेमणुकीबाबत शाळेने शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्यापही शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे.
शाळेत अध्यापनासाठी पुरेसे शिक्षक आहेत. मात्र, पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना अंगणवाडी शिक्षिकेकडून अध्यापन केले जाते, याबाबत काहीही माहिती नाही. तसेच, शिक्षक उपलब्ध नसल्यास शाळेत कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांची नेमणूक करण्याचे अधिकार मुख्याध्यापिकांना देण्यात आले आहेत.वीणा सोनवणे प्रशासकीय अधिकारी, एन विभाग