मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)द्वारे मुंबईचा चेहरा बदलणारी प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पातील मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी -३) ला ८ डिसेंबर २०११ रोजी मंजुरी मिळाली होती. कॉंग्रेस सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या प्रकल्पां आता वेग येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वे सेवेबाबत सोमवारी माहिती देताना रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी एमयूटीपी ३ मधील पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे, विरार-डहाणू चौपदरीकरणाला गती देण्यात येणार आहे. तसेच जुने, रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्याचे स्पष्ट केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. यावेळी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी २३,७७८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबाबत रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळातील अर्थसंकल्पांच्या २० टक्के अधिक आहे. सध्या महाराष्ट्रात १,५८,८६६ कोटी रुपयांच्या ६,९८५ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे ४७ प्रकल्प सुरू आहेत. २०१४ सालापासून २,१०५ किमी नवीन रेल्वे मार्ग बांधण्यात आल्याने महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होईल. हे प्रमाण मलेशियातील रेल्वे मार्गापेक्षा अधिक आहे. तसेच २०१४ सालापासून १,०६२ रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत, असे वैष्णव म्हणाले.
राज्यात १३२ अमृत स्थानके निर्माण करण्यात येत असून ५,५८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच मुंबईतील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी आठ टर्मिनसचे नुतनीकरण केले जाणार आहे. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेल, पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, वांद्र टर्मिनस, जोगेश्वरी या स्थानकामध्ये प्रवासी क्षमता वाढवली जाणार आहे. यासह प्रवासी सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने प्रकल्पांसह विविध स्थानकांवर आणि इतर महत्त्वाच्या स्थानकांवर पायाभूत सुविधांच्या विकासावर वैष्णव यांनी चर्चा केली. एमयूटीपी तीन आणि एमयूटीपी तीन ए सारख्या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. तसेच सध्या मुंबई उपनगरीय मार्गावरून ३,०३२ लोकल धावत असून, येत्या वर्षात लोकल फेऱ्यांमध्ये १० टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल, विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.
बुलेट ट्रेनचा प्रकल्प उद्धव ठाकरेंमुळे रखडला – रेल्वेमंत्री
देशातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प २०२३ मध्ये पूर्णत्वास येणार होता. मात्र, हा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले. दोन वर्षांपूर्वी देखील बुलेट ट्रेन प्रकल्प रखडल्याचा ठपका रेल्वेमंत्र्यांनी ठाकरे सरकारवर ठेवला होता. तर, सोमवारी पुन्हा त्याची पुनरावृत्ती केली.
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंतिम मुदतीवर रेल्वेमंत्र्यांचे मौन कायम
गेल्या महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील सर्वात महत्वाच्या घणसोली येथील अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्याच्या कार्यस्थळी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव भेट दिली होती. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंतिम मुदतीबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी मौन बाळगले. तर, सोमवारी पत्रकारांनी पुन्हा प्रकल्पाच्या अंतिम मुदतीबाबत प्रश्न विचारला असता, ठोस अपेक्षित अंतिम मुदतीची तारीख स्पष्ट केली नाही.
बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत २४० किमोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर जपानी संरचनेची ट्रेन चालवण्यात येईल. तसेच मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, घणसोली, समुद्राखालील कामे प्रगतीपथावर आहेत. यासह नदीवरील पूल, स्थानकांची माहिती वैष्णव यांनी दिली.