लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सीएसएमटी – धुळे आणि पनवेल – हुजूर साहेब नांदेडदरम्यान अतिरिक्त उत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०७६१६ उत्सव विशेष रेल्वेगाडी पनवेल येथून १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १.२० वाजता सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे १९ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७६१५ उत्सव विशेष रेल्वेगाडी हुजूर साहेब नांदेड येथून १७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता सुटेल आणि पनवेल येथे १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.२० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा येथे थांबे असतील. या रेल्वेगाडीला २० डबे असून यामधील एक तृतीय वातानुकूलित डबा, ११ शयनयान डबे, ८ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी संरचना आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

आणखी वाचा-मुंबई : २२ व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

गाडी क्रमांक ११०११ सीएसएमटी – धुळे एक्स्प्रेस सीएसएमटीवरून १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी रात्री ८.५५ वाजता पोहचेल. तर, गाडी क्रमांक ११०१२ धुळे ते सीएसएमटी एक्स्प्रेस धुळे येथून १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे त्याच दिवशी दुपारी २.१५ वाजता पोहचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जामदा, शिरुड येथे थांबा आहे. तर, या रेल्वेगाडीला १६ डबे असून यामधील एक वातानुकूलित चेअर कार डबा, १३ विनावातानुकूलित चेअर कार डबे (पाच आरक्षित आणि ८ विनाआरक्षित) एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी संरचना आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel nanded csmt dhule special trains on the occasion of diwali mumbai print news mrj