मुंबई : दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पनवेल – नांदेडदरम्यान २४ अतिरिक्त उत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक ०७६२६ पनवेल – नांदेड द्वि – साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या १२ फेऱ्या धावतील. ही रेल्वेगाडी पनवेल येथून २२ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत दर मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी २.३० वाजता सुटेल आणि हजूर साहीब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७६२५ नांदेड – पनवेल द्वि – साप्ताहिक उत्सव विशेष रेल्वेगाडीच्या १२ फेऱ्या धावतील. ही रेल्वेगाडी हजूर साहीब नांदेड येथून २१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत दर सोमवारी आणि बुधवारी रात्री ११ वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी रात्री १.२५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी आणि पूर्णा येथे थांबा देण्यात येणार आहे. या रेल्वेगाडीला १३ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, १ जनरेटर कार आणि १ पँट्री कार असे डबे असतील. या रेल्वेगाडीचे आरक्षण १४ ऑक्टोबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.