विकास आराखडय़ावरील चर्चेचा रोख न रुचल्याने संतप्त झालेल्या उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांनी बुधवारी शहराच्या महापौर आशा ईदनानी यांचे पती जीवन ईदनानी यांच्या श्रीमुखात भडकावून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सर्व लोकप्रतिनिधींच्या समक्ष उल्हासनगरमधील एका चर्चासत्रात हा प्रकार घडला.
पप्पूंची पाश्र्वभूमी विचारात घेऊन त्याला तडीपार करण्याची मागणी जीवन ईदनानी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. उल्हासनगर शहराचा विकास आराखडा विषयावर उल्हासनगर बचाव समितीने एका चर्चासत्राचे बुधवारी आयोजन केले होते. यावेळी आमदार बालाजी किणीकर, कुमार आयलानी, गणपत गायकवाड, सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. विकास आराखडय़ावर उलटसुलट चर्चा सुरू होती.
भाजपचे नरेंद्र राजानी यांनी हा विकास आराखडा शहराला देशोधडीला लावणारा आहे. हा आराखडा राबविण्यामागे काही माफियांचा हात आहे. त्यामुळे हा आराखडा फेटाळून लावला पाहिजे अशी मागणी केली. त्यानंतर साई बलराम पक्षाचे जीवन ईदनानी यांनी राजानी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हा विकास आराखडा शहराचा कायापालट करणार आहे. काही राजकीय मंडळी स्वार्थासाठी या आराखडय़ाला विरोध करीत आहेत असे म्हणत ईदनानी यांनी आपली नजर पप्पू कलानी यांच्या दिशेने वळविली.
ईदनानी हे आपल्याला पाडून बोलत आहेत असा समज झाल्याने पप्पू कलानी यांनी भर कार्यक्रमात जीवन ईदनानी यांच्या श्रीमुखात भडकावून त्यांना मारहाण केली. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात पप्पूविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader