उल्हासनगरचे माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक सुरेश बुधरमल ऊर्फ पप्पू कलानी याला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने अखेर एक लाख रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला. मात्र, त्याला उल्हासनगर पोलिसांसमोर दर १५ दिवसांनी हजेरी लावण्याचा अपवाद वगळता उल्हासनगर हद्दीत जाण्यास मज्जाव केला.
कल्याण सत्र न्यायालयाने इंदर भटिजा हत्या प्रकरणात पप्पूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात उच्च न्यायालयात त्याने अपील दाखल केले. या हत्येशी आपला थेट संबंध असल्याचा वा खुनाच्या कटात आपला सहभाग असल्याचा  कुठलाही पुरावा पोलिसांतर्फे सादर करण्यात आलेला नाही. या खटल्यात जामिनावर सुटका झाल्यापासून ते शिक्षा सुनावण्यात येण्याच्या कालावधीत आपल्याकडून काहीच गैरप्रकार वा वागणूक घडलेली नाही, असे सांगत पप्पूने जामीन देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. या उलट सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतरही कलानी आणखी काही गुन्ह्य़ांमध्ये सामील झाला असून त्यातून त्याला न्यायालयीन व्यवस्थेविषयी किती आदर आहे हे स्पष्ट होत असल्याचे सांगत सरकारतर्फे जामीन अर्जाला तीव्र विरोध करण्यात आला.
मात्र, न्या. नरेश पाटील व न्या.अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने पप्पूला एक लाख रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला. पप्पूतर्फे अॅड्. नितीन प्रधान, तर सरकारतर्फे अॅड्. विकास पाटील यांनी युक्तिवाद केला.

Story img Loader