उल्हासनगरचे बिहारीकरण करत या शहराचा तथाकथित अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरणारा माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक सुरेश बुधरमल ऊर्फ पप्पू कलानी याला मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश्वरी बापट-सरकार यांनी इंदर भटिजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पप्पूसह त्याच्या तीन साथीदारांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून अन्य दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींना पाच हजार रुपयांचा दंड व तो न भरल्यास वाढीव सहा महिन्यांची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.
पप्पूला शिक्षा जाहीर होताना न्यायालयाच्या आवारात जमलेले त्याचे समर्थक हादरून गेले. शिक्षा सुनावल्यानंतर पप्पूने न्यायालयाला आपणास फाशीची शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. मात्र, न्यायालयाने ती मान्य केली नाही. या वेळी तो निर्विकार चेहरा करून होता. शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयाबाहेर आणले, तेव्हा आवारात उभ्या असलेल्या समर्थकांनी पप्पूला भेटण्यासाठी गलका केला. या वेळी समर्थकांना रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
मंगळवारी शिक्षा सुनावताना याप्रकरणी ठपका ठेवण्यात आलेले रिचर्ड, डॉ. नरेंद्र यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या आरोपींवर गुन्ह्य़ाचा कट रचणे, खून करणे असे आरोप होते. पप्पूसह बच्ची, बाबा, मोहमद यांनाही जन्मठेप सुनावण्यात आली. पप्पू कलानीवर २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील विकास पाटील शिरगावकर यांनी न्यायालयापुढे शनिवारी केली होती. न्यायाधीश राजेश्वरी बापट-सरकार यांनी मंगळवारी पप्पूबाबत सकाळीच निर्णय देऊन दिवसभराच्या चर्चेला पूर्णविराम दिला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे पप्पूच्या वकिलांनी सांगितले.
राजकीय कारकीर्द
पप्पू कलानीने उल्हासनगरावर तीन दशके आपली मांड बसविली. टाडाखाली अटक झाल्यानंतर पत्नी ज्योती कलानी यांनी ‘उल्हासनगर पीपल्स पार्टी’ स्थापन केली. तुरुंगात राहूनही पप्पू आमदार म्हणून निवडून यायचा. कालांतराने त्याचा राजकीय करिश्मा कमी होऊ लागला. काही वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीत सत्ता गमवावी लागल्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कुमार आयलानी यांनी पप्पूला पराभवाचा धक्का दिला. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही त्याच्या पत्नीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसावे लागले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा