मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी आपले नाव पुढे केल्याचा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामीन मागताना केला आहे. विशेष न्यायालयानेही देशमुख यांच्या या अर्जाची दखल घेऊन त्यावर सीबीआयला १४ ऑक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >>> अटक करणाऱ्या एटीएस अधिकाऱ्याची उलटतपासणी ; प्रज्ञासिंह ठाकूर यांची अचानक विशेष न्यायालयात उपस्थिती

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांत उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर देशमुख यांनी आता सीबीआयने त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणांतही जामीन देण्याची मागणी केली आहे. देशमुख यांनी वकील अनिकेत निकम आणि इंदरपाल सिंह यांच्यामार्फत गुरुवारी विशेष सीबीआय न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. आपल्याविरोधातील आरोप हे तपास यंत्रणेची इच्छा आणि कल्पनेवर आधारित आहेत, असा दावा देशमुख यांनी केला आहे. तसेच ज्या साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेवरही देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संपूर्ण प्रकरण परमबीर आणि वाझे यांच्या जबाबांवर आधारित आहे. वाझे यांच्याविरोधात अनेक आरोप आहेत. बारमालकांकड़ूनही त्यांनीच पैसे वसूल केले असा दावा देशमुख यांनी जामिनासाठीच्या अर्जात केला आहे. परमबीर यांनीच वाझे यांना पोलीस दलात पुन्हा सामावून घेतले. दोघांनी स्वत:ला वाचवण्यासाठी संगनमताने आपले नाव पुढे केल्याचे आरोप देशमुख यांनी केले आहेत.

Story img Loader