गावातला वरच्या जातीतला मुलगा पोटच्या पोरीचा विनयभंग करतो आणि त्याच्या विरोधात कोणतीही तक्रार करता येत नाही.. तक्रार केली आणि गावच्या लोकांनी पारधी जमातीच्या १२ कुटुंबांवर बहिष्कार टाकला. आता ही १२ कुटुंबं आझाद मदानाच्या आश्रयाला आली आहेत.
मुंबईत चाललेल्या अर्धवटराव आणि आवडाबाई यांच्या कार्यक्रमामुळे सध्या मुंबईकरांचं मनोरंजन होत आहे. हा मनोरंजनाचा जलसा आता आठवडाभर चालू राहणार आहे. या जलशामुळेच की काय, पण सध्या आझाद मदानातील आंदोलनांचा कोपरा ओस पडला आहे. असं कधी कधीच होतं. वर्षांतले बाराही महिने गजबजलेला हा कोपरा असा ओकाबोका राहिला की, मुंबईच्याही अंगावर काटा येतो. गेले १५ दिवस आझाद मदानाच्या चकरा मारत असताना वारंवार ही मोकळी जागा डोळ्यात खुपत होती. एकही मोठं आंदोलन नाही, एकाही नेत्याचं भाषण नाही, कुठेही मांडव उभारलेले नाहीत, गर्दी नाही..
पण आझाद मदान म्हणजे फक्त आंदोलनाचा कोपरा नाही. आधी सांगितल्याप्रमाणे या आंदोलनाच्या कोपऱ्यापलीकडेही मोठे आझाद मदान आहे. ज्या आझाद मदानावर मुंबईतल्या स्थानिक क्रिकेटचा पिंड पोसला आहे, ज्या आझाद मदानात मुंबईतील उत्तम कॉफी मिळते, ज्या आझाद मदानात भावी सनदी अधिकारी तयार होतात आणि याच आझाद मदानाच्या आसऱ्याला अनेक फेरीवालेही आपली रोजीरोटी कमावण्यासाठी उन्हापावसाची तमा न बाळगता ठिय्या देऊन असतात.
मुंबईची माहिती असलेल्या, पण मुंबईत पहिल्यांदाच येणाऱ्या व्यक्तीला या भागातील कॅननची पावभाजी खायचीच असते. भुकेल्यांची भूक आणि तहानलेल्यांची तहान भागवणारा हा आझाद मदानाचा भाग मुंबईकरांच्या अति आवडीचा आहे. कॅनन, साऊथ कॉर्नर, सरबतवाला, चायनीज कॉर्नर अशी १२ दुकाने इथे आहेत. येथील साऊथ कॉर्नरमध्ये मिळणारा म्हैसूर मसाला डोसा खूपच भारी असतो, असं मुंबईकर सांगतात. त्याशिवाय इथे मिळणारी सरबतंही लोकांच्या पसंतीला उतरलेली आहेत.
अनेक दिवस मदानात कोणतंच मोठे आंदोलन नसल्याने इथल्या वैयक्तिक आंदोलकांना मोकळी जागा मिळाली आहे. तरीही हे आंदोलक या आंदोलनाच्या कोपऱ्यातील आपली जागा टिकवून आहेत. गेल्या दोन-तीन खेपांमध्ये या आंदोलकांपकी एक कुटुंब सारखे लक्ष वेधून घेत होते. १०-१२ पुरुष, सात-आठ बायका आणि तेवढीच चिमुरडी मुलं इथे पथाऱ्या पसरून बसले आहेत. सहज फेरफटका मारताना या आंदोलकांच्या मागे लावलेल्या फलकावर नजर टाकली असता या कुटुंबीयांची व्यथा लक्षात आली. गेल्या वेळी गंगुबाई काळे यांच्या भेदक नजरेने गुंतवले होते आणि या वेळी या फलकाने थबकायला लावले. हे कुटुंबही पारधी समाजातीलच!
पारधी समाज हा स्वातंत्र्याआधीपासूनच दरोडेखोर समाज म्हणूनच प्रसिद्ध आहे. देशभरातल्या कोणत्याही गावकुसाबाहेर असलेल्या या समाजाच्या लोकांना गावातील लोक हाकलवण्याच्या मागे असतात. या समाजाने मुख्य प्रवाहात येण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तथाकथित उच्च जातीचे लोक त्यांना नाकारतात, हे सत्य आहे. या कुटुंबाचीही काहीशी अशीच कहाणी आहे. अहमदनगर जिल्ह्यतील नेवासे तालुक्यातील भोंड गावात राहणारे हे काळे कुटुंब! वास्तविक नेवासे तालुका म्हणजे संत ज्ञानेश्वरांचा तालुका. पण या माऊलीच्या तालुक्यात पारधी समाजाच्या या काळे कुटुंबाबरोबरच आणखी १२ कुटुंबीयांना गेली चार र्वष वनवास सहन करावा लागत आहे. सुभाष काळे हे त्यांच्या कुटुंबीयांबरोबर इथे शांतपणे गुजराण करत असताना २०१३मध्ये गावातल्याच एका उच्च जातीच्या मुलाने त्यांच्या १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीने मोठय़ा धाडसाने त्या मुलाला तेथून हुसकावून लावले आणि घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. सुभाष काळे यांनी पोलिसांमध्ये धाव घेत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि मग गावातील तथाकथित उच्च समाजाकडून या पारधी समाजाची मुस्कटदाबी सुरू झाली. या १२ कुटुंबांवर गावाने बहिष्कार टाकला. त्यांना रोजगार नाकारला. त्यांचं पाणी तोडलं. सार्वजिनक पाणपोईवर पाणी प्यायला गेले, तर अशा पाणपोयाच बंद करून टाकल्या. अखेर हे हाल सहन झाले नाहीत आणि चार वर्षांपूर्वी काळे आणि अन्य ११ कुटुंबांनी आपलं राहतं गाव सोडून मुंबई गाठली. तेव्हापासून न्याय मिळवण्यासाठी लढा सुरू झाला. विरळ होत चाललेले केस, काळ्या दाढीतून डोकावणारे चुकार पिकलेले केस, डोळ्यात हतबल भाव घेऊन आपला विस्कटलेला संसार सांभाळत बसलेले सुभाष काळे सांगत होते.
आझाद मदानातल्या या कोपऱ्यात ही बारा कुटुंबं गेल्या चार वर्षांपासून ठिय्या मांडून बसली आहेत. दिवसभर या मदानात बसायचं आणि उन्हं उतरणीला लागली की, चंबुगवाळं उचलून बाहेरच्या फुटपाथवर पथारी पसरायची, हे गेली चार र्वष चालू आहे. मध्यंतरीच्या काळात पुणे जिल्ह्य़ातल्या शिरूर तालुक्यात या १२ कुटुंबीयांना जमीन दिली होती. हे सगळे तिथे जाऊन पालं ठोकून राहायलाही लागले, पण सरकारच्या मनात आलं आणि चार महिन्यांत त्यांना तिथूनही बाहेर काढलं. पुन्हा ही कुटुंबं आझाद मदानातल्या पिंपळाच्याच आसऱ्याला आली आहेत. आंदोलन चालूच आहे. कुटुंबातला एक जण दर दिवशी मंत्रालयात खेटे घालतो. दुसरा जवळच्या दग्र्यात जाऊन सर्वासाठी जेवण घेऊन येतो. लग्नसराईच्या मोसमात काही जण वाढपी म्हणून कंत्राटी तत्त्वावर कामाला जातात. मुलांची शिक्षणं थांबली आहेत. मोठे लोक सरकार नावाच्या अजस्र यंत्रणेशी लढा देत देत हताश झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी या कुटुंबातील दोन लहानगे आजारी पडले आणि पुन्हा या कुटुंबाची धावाधाव सुरू झाली. जेजे, जीटी अशा वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयांमध्ये नेण्यात आलं. रक्ताच्या चाचणीसाठी पसे मागितल्यावर खिशात पसे नसल्याने या दोन मुलांना घेऊन सुभाष काळे यांनी अखेर लोणावळा गाठलं आणि तिथे या मुलांवर इलाज चालू केले.
आपल्याच गावाने वाळीत टाकलेल्या लोकांचा संघर्ष चालू आहे तो डोक्यावर हक्काचा निवारा मिळवण्यासाठी. ध्रुवाने म्हणे अढळपद मागितलं होतं. त्याला ते मिळालंही. पण या १२ कुटुंबांच्या नशिबात मात्र रात्री आझाद मदानाबाहेरच्या फुटपाथवर आडवं पडून तो आकाशातला अढळ ध्रुवतारा बघण्याखेरीच काहीच नाही.
रोहन टिल्लू @rohantillu
Email – Rohan.tillu@expressindia.com