मुंबई : मध्य रेल्वेवरील परळ रेल्वे कारखाना (वर्कशॉप) बंद होण्याच्या मार्गावर असून यामधील कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या वेगवेगळय़ा कारखान्यांत पाठवण्यात येण्याची योजना आखली आहे. त्यानंतर परळ कारखान्याच्या ४७ एकरमधील भागात कोचिंग टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव आहे. कर्मचाऱ्यांनी मात्र याला विरोध केला असून या प्रस्तावाविरोधात मंगळवारी सीएसएमटी येथे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून मोर्चा काढण्यात आला. मध्य रेल्वे प्रशासनाने कारखाना बंद करून व्यावसायिकीकरण करून जमिनी हडपण्याचा घाट घातला आहे, असा आरोप संघाकडून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेवर १८७९ साली वाफेवरील इंजिन तयार करण्यासाठी परळ कारखाना उभारण्यात आला होता. तर, परळ कारखान्यात डिझेल, विद्युत रेल्वे इंजिन, नॅरोगेज लोको तयार करण्यात येत असून त्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाते. तसेच एलएचबी डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम येथे केले जाते. मात्र मध्य रेल्वेने कोणतीही आवश्यकता नसताना, परळ कारखाना बंद करून त्या जागेवर टर्मिनस उभारणार आहे. सीएसएमटी, एलटीटी, दादर टर्मिनस असताना परळ टर्मिनसची आवश्यकता नाही. तर परळ कारखान्यातील मोठमोठय़ा यंत्रणा माटुंगा, सानपाडा येथे पाठवण्यात येणार आहेत.

तसेच वर्षांनुवर्षे कारखान्यात काम करीत असलेल्या सुमारे दोन हजार कुशल रेल्वे कर्मचाऱ्यांना बडनेरा, लातूर, रत्नागिरी येथील कारखान्यात पाठविण्यात येणार आहे. तसेच कारखान्यातील ब्रिटिशकालीन वास्तूंचे नुकसान होणार आहे. यासह या भागात ६०० रेल्वे कर्मचाऱ्यांची घरे असून त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. यासह अनेक झाडांची तोड करण्यात येणार आहे, असे  सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सरचिटणीस प्रवीण वाजपेयी यांनी सांगितले.

सध्या सीएसएमटी, दादर येथे लोकल, लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा मोठा ताण आहे. या भागातून कोणतीही नवीन रेल्वेगाडी सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे मध्य रेल्वेने परळ कारखान्यातील मशीन्स माटुंगा व इतरत्र पाठवून त्या जागेवर प्रवासी टर्मिनस उभारण्यात येणार आहे. तसेच कुर्ला ते सीएसएमटी पाचवी आणि सहावी मार्गिका तयार करण्याचा मार्ग खुला होणार आहे. त्यामुळे भविष्यात लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाडय़ा वाढवण्यावर भर दिला जाईल, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी सांगितले.