मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावरील दहा स्थानकांचा कायापालट करण्याची योजना आखणाऱ्या रेल्वे बोर्डाने आता परळ टर्मिनसचा रखडलेला प्रकल्प अंतिम टप्प्यात आल्याची माहितीही दिली आहे. परळ टर्मिनसचा आराखडा तयार असून त्याची फाइल रेल्वे बोर्डाच्या अर्थविभागाकडे मंजुरीसाठी आली आहे, अशी माहिती बोर्डाचे सदस्य सुबोध जैन यांनी दिली. परळ टर्मिनस तयार झाल्यावर येथून बाहेरगावच्या गाडय़ा रवाना होणार आहेत. मात्र त्यासाठी सध्याच्या परळ स्थानकातही सुधारणा कराव्या लागतील, असे जैन यांनी सांगितले.
सध्या मध्य रेल्वेवर दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस या तीन स्थानकांवरून बाहेरगावी जाणाऱ्या गाडय़ा रवाना होतात. कुर्ला ते ठाणे या दरम्यान पाचवा व सहावा मार्ग तयार झाल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या काही गाडय़ा लोकमान्य टिळक टर्मिनसहून रवाना होण्यास सुरुवात झाली. मात्र सध्या मध्य रेल्वेमार्गावरील वाहतुकीचा भार लक्षात घेता आणखी एका टर्मिनसची आवश्यकता होती. त्यासाठी परळ येथे रेल्वेच्या जागेत टर्मिनस उभारण्याबाबत रेल्वेने गंभीरपणे विचार सुरू केला होता. या प्रकल्पाचा आराखडा आणि प्रकल्पाचा मसुदा मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाच्या अर्थ खात्याकडे पाठवण्यात आला आहे.
तो परत आल्यानंतर मग निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती जैन यांनी दिली. हे टर्मिनस पूर्ण झाल्यानंतर दादर तसेच मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दोन्ही स्थानकांवरील भार कमी होणार आहे.
काय असेल नव्या टर्मिनसमध्ये?
* बाहेरगावच्या गाडय़ांसाठी खास प्लॅटफॉर्म
* टॅक्सीसाठी मार्गिका
* लोकमान्य टिळक टर्मिनसप्रमाणे स्वतंत्र इमारत