गैरहजर शिक्षकांची जागा भरून काढण्यासाठी पालकांनाच आपला नोकरी-व्यवसाय सोडून वर्गात हजेरी लावण्याची सक्ती केली जात असल्यामुळे माटुंग्याच्या ‘डॉन बास्को शाळे’च्या पालकांमध्ये नाराजीची भावना आहे. विकासकामाच्या नावाखाली पालकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या निधीबाबतही पालकांमध्ये नाराजी आहे.
पहिली ते चौथीच्या वर्गामध्ये एखादा शिक्षक गैरहजर असेल तर पालकांनाच वर्गावर हजर राहण्याची सक्ती शाळेत केली जात आहे. गेले तीन वर्षे हा प्रकार सुरू आहे. शिक्षकांच्या गैरहजेरीत जे पालक वर्ग घेऊ शकतील अशा पालकांची यादीच शाळेने तयार केली आहे. एखाद्या शिक्षकाने दांडी मारल्यास शाळेतून बोलावणे येते आणि आपला नोकरी-व्यवसाय सोडून पालकांना शाळेत जाऊन वर्ग सांभाळावे लागतात.
काही नाराज पालकांनी या बाबत ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’च्या कार्यकर्त्यांकडे तक्रार केली. त्यावर सोमवारी मनविसेचे उपाध्यक्ष सुधाकर तांबोळी यांच्या शिष्टमंडळाने शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत मनविसेचे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष साईनाथ दुर्गे, उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे, सरचिटणीस संतोष धोत्रे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मनमानी न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनविसेने दिला आहे. या संबंधात शाळेचे मुख्याध्यापक फादर बॉस्को डिमेलो यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
पालकांच्या तक्रारी
* विकासकामांच्या नावाखाली वारंवार पैशाची मागणी, शिवाय या देणग्यांची पावती देण्यासही नकार
* वर्ग न घेणाऱ्या पालकांच्या पाल्यांकडे शिक्षकांचे दुर्लक्ष
* देणगीदार पालकांच्या मुलांकडेच विशेष लक्ष
* देणगीदार पालकांच्या मुलांनाच क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा