मुंबई : मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळांमध्ये प्रवेश पाल्याला प्रवेश घेण्यासाठी पालकांचा यंदाही मोठा प्रतिसाद मिळत असून येत्या शैक्षणिक वर्षांतील प्रवेशासाठी दहा हजारांहून अधिक प्रवेशअर्ज महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे आले आहेत. त्यात नर्सरीसाठी ३ हजारांहून अधिक प्रवेशअर्जांचा समावेश आहे.
हेही वाचा >>> मुंबई : कोकण मंडळाच्या २५ हजार अर्जदारांची प्रतीक्षा संपणार? २६ जानेवारीला सोडत?
महानगरपालिका प्रशासनाने आर्थिकदृष्टया दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेता यावे, याकरिता आतापर्यंत २२ शाळा सुरु केल्या आहेत. यंदा या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांमध्ये चुरस लागली होती. दरम्यान, पालिकेने शाळेच्या प्रवेशप्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी सोडत पद्धतीने प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत पालिकेच्या २२ मुंबई पब्लिक स्कूलमधून सन २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षाकरिता १० हजार ८७९ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. सर्वाधिक अर्ज पालिकेच्या के पश्चिम येथील एमपीएस प्रतीक्षा नगर शाळेसाठी आले आहेत. या शाळेसाठी एकूण ११६३ विद्यार्थ्यांचे अर्ज पालिकेकडे आले आहेत. त्यानंतर के पूर्व विभागातील एमपीएस पूनम नगर शाळेसाठी १०३८ व एम पूर्व विभागातील एमपीएस आशिष तलाव शाळेसाठी १०३२ अर्ज आले आहेत. यंदा नर्सरी ते सहावीच्या ७ हजार जागांसाठी तब्बल १० हजार प्रवेशअर्ज आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश देताना पालिकेच्या शिक्षण विभागाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सोडत प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी २७ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच, ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत प्रवेशाची सोडत प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी ५ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे.