मुंबई : मुंबई महापालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई मंडळाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यंदाही पालकांनी चांगला प्रतिसाद आहे. नर्सरीच्या (छोटा शिशु) वर्गाच्या १२४२ जागांसाठी तब्बल २७०० हून अधिक अर्ज आले आहेत. चारही बोर्डाच्या मिळून २१ शाळांसाठी येत्या ३ ते ६ फेब्रुवारी या काळात सोडत काढण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिकेच्या केंद्रीय व आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असतात. त्यामुळे पालिकेच्या या शाळांचे प्रवेश हे सोडत पद्धतीने होत असतात. अन्य मंडळांच्या खासगी शाळांचा खर्च परवडत नसल्यामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलांना या शाळांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे पालिकेच्या शाळांना मोठा प्रतिसाद असतो. यंदाही या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जागांच्या तुलनेत दुपटीने अर्ज आले आहेत.

हेही वाचा…बेस्ट बस आगीत जळून खाक

मुंबईत २०२० मध्ये जोगेश्वरी पूर्वेकडील पूनमनगरमध्ये मुंबई पब्लिक स्कूलमध्ये (पालिकेची शाळा) सीबीएसईची पहिली शाळा सुरू झाली. मुंबई महापालिकेच्या या शाळेला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पालिकेने अन्य ठिकाणीही आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई शाळा सुरू केल्या. २०२१ मध्ये पालिकेने आणखी दहा ठिकाणी सीबीएसईच्या शाळा सुरू केल्या. तसेच आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई मंडळाच्याही एक एक शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांनाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यानंतर पालिकेने सीबीएसई शाळेतील छोटा शिशू व बालवाडी वर्गाचीही एक एक तुकडी वाढवली होती. सीबीएसई, आयसीएसई व केंब्रीज मंडळाच्या शाळांमध्ये नर्सरीच्या दोन तुकड्या आहेत.

सीबीएसई, आयसीएसई व केंब्रीज मंडळाच्या शाळांमधील प्रत्येक वर्गाची पटसंख्या ४० विद्यार्थी इतकी आहे. आयबी मंडळाच्या शाळेमधील प्रत्येक वर्गाची पटसंख्या ३० आहे. महापौरांच्या स्वेच्छाधिकाराच्या १० टक्के जागा राखीव असतात. तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवण्यात येातत. त्यातून उर्वरित जागांवर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा…भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये फूडस्टाॅल, एटीएम आणि बरेच काही… विविध कंपन्यांना जागा, एमएमआरसीला मिळणार महसूल

प्रवेशासाठी आलेल्या अर्जांची छाननी २२ जानेवारीपर्यंत पूर्ण केल्यानंतर त्यातील पात्र अर्जातून ३ ते ६ फेब्रुवारी या काळात सोडत काढली जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. अपूर्ण अर्ज, निकषांत न बसणारे अर्ज, दुबार अर्ज वगळून लॉटरी काढली जाईल. तसेच विद्यार्थ्यांच्या निवासाचा पत्ता पाहून एक किमीच्या परिघात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक फेरी, त्याचप्रमाणे ३ किमी व ५ किमीच्या परिघात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी व तिसरी फेरी अशी सोडत काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दर दिवशी पाच शाळांच्या सोडत पूर्ण केल्या जाणार आहेत. त्याचे वेळापत्रकही ठरवण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents shown good response for admission to mumbai municipal corporations cbse icse ib and igcse schools this year mumbai print new sud 02