मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र धोरण जाहीर
पादचाऱ्यांना विनाअडथळा सुरक्षितपणे चालता यावे यासाठी पालिकेने पदपथांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर केले आहे. रेल्वे स्थानकाबाहेरील पादचाऱ्यांची वर्दळ लक्षात घेता तेथील पदपथांची रुंदी वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात पदपथावर वाहनतळास परवानगी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे भविष्यात पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे होण्याची आशा पालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
मुंबईमधील अनेक पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. खड्डे आणि अनियमित चढ-उतारांमुळे पदपथावरून चालताना पादचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नव्या धोरणात पदपथाची रुंदी तीन भागांमध्ये विभागण्यात आली आहे. दुकानांलगतचा अध्र्या मीटर रुंदीचा भाग मृत भाग म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. दुकानाची वा मालमत्तेच्या रेषेचा त्यात समावेश असेल. त्यालगतचा भाग पादचाऱ्यांसाठी मोकळा असेल आणि त्यापुढील रस्त्यालगतचा भाग स्ट्रीट फर्निचरसाठी राखीव असणार आहे. पादचाऱ्यांसाठी १.८० मीटर रुंद भाग असावा आणि या भागावरील २.२० मीटर उंचीपर्यंत कोणतेही फलक, छप्पर बसविता येणार नाहीत. तसेच या भागात उपयोगिता वा अन्य कोणत्याही कारणास्तव तात्पुरते बांधकामही करता येणार नाही. पदपथ व रस्ते पूर्णपणे वेगळे राहावेत आणि पादचाऱ्यांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी यासाठी पदपथावर दोन्ही बाजूंना सुरक्षा खांब बसविण्यात येणार आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पदपथांवरील सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.
- पदपथावरील विजेचा खांब, झाडे, मार्गदर्शक फलक, टपाल पेटी, कचरा पेटी आदी बाबींना पदपथावर राखीव ठेवलेल्या स्ट्रीट फर्निचरच्या जागेत स्थान देण्यात येणार आहे. सध्या यापैकी अनेक गोष्टी दुकानांलगतच्या भागात पदपथावर आहेत. त्यामुळे नव्या धोरणानुसार आताच्या जागेवरून त्या स्ट्रीट फर्निचरच्या जागेत स्थलांतरित कराव्या लागणार आहेत.
- पदपथांवरील वाहनतळांमुळे पादचाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. पालिकेने भविष्यात पदपथाचा वापर वाहनतळासाठी करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे.
- सध्या पदपथावर असलेल्या वाहनतळांना भविष्यात पुनर्नोदणी करण्यात येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वा दुर्मीळ प्रकरणांमध्ये केवळ १५ दिवस पदपथावर वाहनतळासाठी परवानगी देण्यात येईल, मात्र त्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे.