मुंबई : बोरिवली रेल्वे स्थानकालगत बांधण्यात येणाऱ्या प्रसूतिगृहाच्या भूखंडाचा महापालिका प्रशासनाने आता महसूल प्राप्तीसाठी वापर सुरु केला आहे. गेल्या ५ वर्षांपासून या परिसरातील नागरिकांना प्रसूतीगृहाची प्रतीक्षा आहे. मात्र, पालिकेने अचानक या भूखंडावर पे अँड पार्क सुरु केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. तसेच, प्रसूतीगृहाअभावी या भागातील गरोदर महिलांना आणखी काही काळ अन्य ठिकाणी उपचारासाठी पायपीट करावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याऐवजी प्रसूतिगृहाच्या भूखंडावर पालिकेने वाहनतळ उभारल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

बोरिवली रेल्वे स्थानकालगत बांधलेल्या पालिकेच्या भन्साळी प्रसूतीगृहाची इमारत धोकादायक झाल्यामुळे ४ ते ५ वर्षांपूर्वी ती जमीनदोस्त करण्यात आली होती. अनेक वर्ष उलटूनही अद्याप प्रसूती गृहाच्या पुनर्बांधणीसाठी महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. संबंधित प्रसूतिगृह तोडल्यापासून बोरिवली व आसपासच्या भागातील महिलांना मागाठाणेतील माता व बालक, भगवती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पायपीट करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बोरिवली रेल्वे स्थानकालगतच्या भूखंडावरील प्रसूतिगृहाची पुनर्बांधणी रखडल्यामुळे गरोदर महिलांची गैरसोय होऊ लागली आहे.

प्रसूतिगृहाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्याऐवजी त्याच भूखंडावर आता पालिकेने महसूल प्राप्तीसाठी पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध केली आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. महापालिकेने २०२२ मध्येही हा भूखंड एका खाजगी संस्थेला पे अँड पार्किंगसाठी उपलब्ध करून दिला होता. मात्र, पालिकेवर टीकेची झोड उठताच संबंधित वाहनतळ बंद करण्यात आले होते. आता पालिकेने त्याच जागेवर पुन्हा वाहनतळ सुरु केले आहे. त्यामुळे या भागातील गरोदर महिलांना आणखी काही वर्षे प्रसूतिगृहाची वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित भूखंडावर हे वाहनतळ तात्पुरत्या स्वरूपात सुरु करण्यात आले आहे. प्रसूतिगृहाची पुनर्बांधणी सुरु होताच ते हटवले जाईल, असे महानगरपालिकेच्या आर मध्य विभागातील सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सांगितले.

Story img Loader