मध्य रेल्वेची लवकरच नवी निविदा; शुल्क ५० रुपयांवर जाणार
मध्य रेल्वेच्या स्थानकांजवळील वाहनतळाचे (पार्किंग) दर वाढविण्यात येणार असून, सध्या २० आणि ३० रुपये असलेले हे दर ५० रुपयांपर्यंत वाढण्याचे संकेत मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. दिवसभरासाठीचे २० व ३० रुपये दर कंत्राटदारांना परवडत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता रेल्वे वाहनतळासाठी नव्याने निविदा काढल्या जाणार असून, त्यात ही दरवाढ केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र रेल्वेच्या या कंत्राटदारधार्जिण्या भूमिकेस प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे.
मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांबाहेर रेल्वेच्या हद्दीतच वाहनतळाची सुविधा प्रवाशांना दिली जाते. कल्याण, ठाणे अशा महत्त्वाच्या स्थानकांबाहेर दर दिवशी हजारो दुचाकी वाहने उभी असतात. या वाहनतळाची व्यवस्था कंत्राटदारांमार्फत पाहिली जाते. त्यासाठी निविदा काढून प्रत्येक स्थानकाबाहेरील जागा, त्या जागेत उभ्या राहू शकणाऱ्या वाहनांची अंदाजे संख्या आदी बाबी गृहीत धरून वाहनतळाचे दर ठरवले जातात. सध्या कंत्राटदारांकडून मासिक पास सेवाही पुरवली जात असल्याने प्रवाशांचीही सोय होते. मात्र कंत्राटदारांच्या मते हे दर खूपच कमी असून त्यातून कंत्राटाच्या कालावधीत त्यांना काहीच फायदा होत नाही. परिणामी कल्याण, ठाणे या स्थानकांबाहेरील वाहनतळाची व्यवस्था सांभाळणाऱ्या कंत्राटदारांनी यातून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता नवीन निविदा प्रक्रियेत हे दर ५० रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने व्यक्त केली.दरम्यान पश्चिम रेल्वेने नुकतीच बेकायदा वाहनतळांवर कडक कारवाई केली आहे. या पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेने हे दरवाढीचे पाऊल उचलले आहे.
प्रवासी संघटनांचा विरोध
रेल्वेच्या या भूमिकेला प्रवासी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. या वाहनतळ प्रकरणामागे नेमके कोणते अर्थकारण दडले आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. कंत्राटदारांनी रेल्वेला दिलेल्या आकडय़ापेक्षा जास्त वाहने कंत्राटदार त्या जागेत उभी करतात. वाहनतळावर दुचाकी वाहने एकमेकांना खेटून लावलेली असतात. सुरक्षेबाबतही काहीच ठोस उपाययोजना नसल्याने ते धोकादायक आहे. वाहनतळ शुल्क आकारताना कंत्राटदार किंवा त्याची माणसे गाडीच्या कोणत्याही नुकसानीची जबाबदारी घेत नाहीत. अशा वेळी केवळ कंत्राटदारांना परवडत नाही, या कारणासाठी दरवाढ करणे हे रेल्वेचे कंत्राटदारधार्जिणे धोरण चूक आहे, असे उपनगरीय प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.