भारतीय नौदलातील पाणबुडड्यांना अलिकडे झालेल्या अपघातांमध्ये सुस्तपणा आणि कामातील ढिलाई हेच महत्वाचे कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नौदलाच्या कामातील स्टॅडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर (एसओपी) काटेकोरपणे पाळल्या जाव्यात, असे निर्देश देण्यात आले असून त्यामध्ये दिरंगाई किंवा गलथानपणा झाल्यास अधिकार-यांवर जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रसंगांना आगामी काळात सामोरे जावे लागणार नाही, असा विश्वास संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केला.
दिर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या ‘स्कॉर्पियन पाणबुडी प्रकल्पा’तील ‘कलवरी’ ही पहिली पाणबुडी मुंबईच्या सुक्या गोदीतून आज पुढील कार्यवाहीसाठी समारंभपूर्वक बाहेर काढण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
दरम्यान, युद्धग्रस्त येमेनमध्ये अडकून पडलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी परत आणण्याची कारवाई आज (सोमवार) संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल, अशीही माहिती पर्रिकर यांनी यावेळी दिली.