गिधाडांची संख्या झपाटय़ाने घटत असल्याने अंत्यविधीसाठी पुरोगामी पाऊल; वरळीत प्रार्थना भवन
तंतोतंत धर्माचरण आणि परंपरा यांचा जबरदस्त पगडा असलेल्या पारसी समाजातील पुरोगामी गटाने अंत्यविधीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पार्थिवावर ‘टॉवर ऑफ पीस’ऐवजी विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यासाठी वरळी येथील स्मशानभूमीत प्रार्थना भवन उभारण्यात आले आहे. गिधाडांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याने अंत्यविधीच्या पारंपरिक पद्धतीत समस्या उभ्या राहिल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी पारसी समाजातील काही पुरोगामींनी पुढाकार घेतला आहे.
इराणमधील पर्शियातून सुमारे एक हजार वर्षांपूर्वी भारतात आलेल्या पारसी समाजाची आता मुंबईतील लोकसंख्या जेमतेम ४५ हजारांच्या आसपास आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबरोबरच मुंबईच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविधांगी विकासात या समाजाने बजावलेली भूमिकाही वादातीत आहे. वेगळी जीवनशैली, खाद्यसंस्कृती आणि अंत्यविधीच्या नैसर्गिक प्रथेमुळे या समाजाची मुंबईत एक वेगळी ओळख आहे. मात्र गिधाडे नामशेष होऊ लागल्याने पारसींच्या अंत्यविधीची प्रथाच संकटात आली, आणि विद्युतदाहिनीच्या पर्यायावर समाजातील काही सुधारणावादी मंडळींनी गांभीर्याने विचार सुरू केला. मात्र, समाजातील काही परंपरावादी मंडळींनी याला विरोध दर्शवल्याने काहीसा पेच निर्माण झाला होता.
मुंबईतील डोंगरवाडी येथे पारसी समाजातील मृत नागरिकांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येतात. येथील विहिरीमध्ये म्हणजेच ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये मृतदेह ठेवण्यात येतो.
मात्र, मुंबईतील गिधाडांची संख्या कमी झाल्याने येथील शवांचे विघटन होण्याची प्रक्रिया सहा-सात महिने लांबू लागली. म्हणून, मुंबई महानगरपालिकेला विनंती करून आम्ही वरळी येथील स्मशानभूमीतील एका जागेवर प्रार्थना भवन उभारण्याची विनंती केली.
समाजातील दानशूर व्यक्तींकडून जवळपास दीड कोटींचा निधी उभा करून येथे एक मोठे प्रार्थना भवन दहा महिन्यांपूर्वी बांधले. दर महिन्याला ८-९ याप्रमाणे आत्तापर्यंत ८० च्या आसपास दहनविधी व प्रार्थना करण्यात आल्याचे या प्रार्थना भवनासाठी पुढाकार घेणारे दिनशॉ तांबोली यांनी सांगितले.
दरम्यान, बॉम्बे पारसी पंचायतीने मात्र पारंपरिक झोरास्ट्रीयन अंत्यविधीचा पुरस्कार केला असून दहन करणे पारसी समाजाला निषिद्ध असल्याने ‘दहनविधी’ करणे चुकीचे असल्याचे पंचायतीचे अध्यक्ष याझ्दी देसाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या अंत्यसंस्काराच्या विधीमुळे दोन वेगळे प्रवाह या समाजात निर्माण झाल्याचे दिसत आहे.
भविष्यात येथे यावेच लागणार
कैकोबाद आणि खुर्शीद रुस्तमफ्राम या पारसी दाम्पत्याच्या निधनानंतर त्यांच्यावर काही महिन्यांपूर्वीच वरळी येथील स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आले. याबाबत त्यांची मुलगी हुतोक्षी रुस्तमफ्राम यांनी सांगितले की, माझे आई-वडील हे मूळचे हैदराबादचे असून तेथेही गिधाडे नसल्याने त्यांना त्यांचे अंत्यसंस्कार व्यवस्थित व्हावेत अशी इच्छा होती. मुंबईत विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर प्रार्थना भवनाची सोय असल्याचे समजल्याने त्यांनी येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. तसेच याबाबत सांगताना पारसी समाजाचे धर्मगुरू फ्रामरोझ मिर्झा म्हणाले की, आम्ही धर्मगुरूंनीही याचा पुरस्कार केला असून मी येथे समन्वयक म्हणून काम करतो आहे. भविष्यात विरोध करणाऱ्या प्रत्येकाला येथेच यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.