लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अंधेरी येथील गुंदवली मेट्रो स्थानकानजिक द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलाच्या छताचा काही भाग गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास धावत्या मोटारीवर कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. या दुर्घटनेत जीवित हानी झाली नसली, तरी सुरक्षा, तसेच, उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्घटनेची यंत्रणांमार्फत चौकशी करण्यात येत आहे.

आणखी वाचा-अंधेरी सहार येथे मुख्य जलवाहिनी खचली, पाण्याच्या चावीचा भाग खचला

अंधेरीतील जोग पुलाची जबाबदारी कोणाची ?

अंधेरीत जोग उड्डाणपुलाचा भाग पडल्यामुळे संध्याकाळी पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला होता व पुढे देखभालीसाठी एमएमआरडीएकडे आणि गेल्यावर्षी तो देखभालीसाठी महापालिकेकडे देण्यात आला होता. मात्र पुलाच्या खालील जागा व्यावसायिक वापरासाठी देण्यात आली होती. या जागेचा स्लॅब कोसळला असून त्याच्या देखभालीची जबाबदारी त्या कंपनीची असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या पुलाची जबाबदारी नक्की कोणाची होती याबाबत अजूनही संभ्रम आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी पुलाच्या मालकीचा वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, महापालिकेकडे पुलाची मालकी नसून केवळ देखभालीची जबाबदारी आहे, असेही पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.