लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाच्या क्रीडा संकुलातील शारीरिक शिक्षण विभागाच्या आवारात आंतरशालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा सुरू असताना विटांच्या भिंतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

दरम्यान, कलिना संकुलातील भिंतीचा भाग कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून विद्यापीठाच्या कारभारावर विद्यार्थी संघटनांकडून टीका होत आहे. तसेच, मुंबई विद्यापीठाच्या संकुलातील जीर्ण झालेल्या इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्यात यावी आणि त्यानंतर तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

‘कलिना संकुलात घडलेली दुर्घटना अत्यंत गंभीर होती. जर विद्यार्थ्यांच्या अंगावर भिंतीचा भाग कोसळला असता तर मोठी दुर्घटना घडली होती. क्रीडा संकुलात विद्यापीठस्तरीय विविध स्पर्धा सातत्याने सुरू असतात. त्यामुळे या स्टेडियमची तात्काळ संरचनात्मक तपासणी करावी आणि देखभाल दुरुस्तीचे काम केलेल्या कंत्राटदारावर कडक कारवाई करावी’, असे छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले.

‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने १३ डिसेंबर २०२४ रोजी कुलगुरूंची भेट घेऊन क्रीडा संकुलाची दुरावस्था निदर्शनास आणून दिली होती. परंतु विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे क्रीडा संकुलातील शारीरिक शिक्षण विभागाच्या आवारात भिंतीचा भाग कोसळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. या विषयाची तात्काळ चौकशी करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी यांनी केली आहे.

दुरुस्तीची कामे तात्काळ करणार : मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाच्या क्रीडा संकुलातील स्लॅबचा भाग कोसळला नसून येथील कोपऱ्यातील जुन्या भागातील जीर्ण झालेल्या भिंतीवरील विटांचा काही भाग कोसळला. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे स्पर्धा सुरू नव्हती. मुंबई विद्यापीठातर्फे तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.