मुंबई : अल्पसंख्यांक याच मातीतील असून जीडीपीमध्ये त्यांचा वाटा मोलाचा आहे. मात्र अल्पसंख्यांकांना गेली दहा वर्षे सर्व क्षेत्रात डावलले जात असून त्यांचा आहार, पोषाख, चालीरीती यांबाबतही प्रश्न उभे केले जात आहेत, असे मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुंबई दक्षिण -मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांनी व्यक्त केले आहे.
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी शनिवारी वांद्रे येथील सायसा क्लब येथे‘अल्पसंख्यांक युवक परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत मुंबई उत्तर -मध्यच्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड आणि अनिल देसाई सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
हेही वाचा…आता पदवीला ६०-४० गुणविभागणी; मुंबई विद्यापीठाचा निर्णय, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अंमलबजावणी
लोकसभेच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीतर्फे अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड उभे आहेत. समाजवादी पक्षाने आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे प्रथमच समाजवादी पक्ष आणि शिवसेना हे एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे.
यावेळी देसाई पुढे म्हणाले, आरटीई कायद्यात महायुती सरकारने केलेले बदल दुर्बल घटकासाठी मारक असून या कायद्यात ॲडव्हान्स कुपन पद्धत आणण्यासाठी तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी संसदेत नवा कायदा आणण्याबाबत प्रयत्न केले जातील.
हेही वाचा…जुन्या वादातून ४८ वर्षीय व्यक्तीचा घरात घुसून खून, मृत बजरंग दलाचा कार्यकर्ता
वर्षा गायकवाड म्हणाल्या, देशात निर्माण केलेले भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी आणि लोकशाही मजबुत करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. अल्पसंख्यांकांना डावलून देश पुढे जावू शकत नाही. राज्यघटना देशाचा आत्मा तर लोकशाही श्वास आहे. या दोन्ही गोष्टी असेपर्यंत अल्पसंख्यांकाच्या हक्कांना कोणी हात लावू शकणार नाही.
इंडिया आघाडी हा सर्वसमावेशक भारत असून लोकसभा निवडणूक आपले हक्क वाचवण्यासाठीची लढाई आहे. त्यामुळे मी समाजवादी पक्षाचा आमदार असूनही ठाकरे गट शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मते मागतो आहे. आपले भविष्य बदलण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन समाजवादीचे आमदार रईस शेख यांनी केले. मुस्लिम मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले असून त्यांच्या गळतीचे प्रमाण घटल्याचे आमदार अस्लम शेख यांनी सांगितले.
हेही वाचा…एक कोटीच्या चरसासह ५७ वर्षीय व्यक्तीला अटक
मुस्लिम ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणाचे लाभ मिळत नाहीत, अल्पसंख्यांक शाळांना मान्यता मिळण्यात अडचणी येतात. पदवीधर होवूनही नोकरी मिळत नाही. शाळांमध्ये प्रवेश मिळत नाहीत. हज समितीने स्पर्धा परीक्षा वर्ग बंद केले, शाळेमध्ये धर्मावरुन भेदभाव केला जातो, शिष्यवृत्ती मिळण्यास अडचणी येतात आदी तक्रारी उपस्थित विद्यार्थ्यांनी मांडल्या. यावेळी मालाड पश्चिमचे काँग्रेस आमदार अस्लम शेख, मुंबई पालिकेचे माजी नगरसेवक असिफ झकेरिया, मुंबई काँग्रेसचे युवक नेते गणेश यादव आणि सुमारे १५० विद्यार्थी उपस्थित होते. अल्पसंख्यांकाना विना भेदभाव वागणूक मिळावी, असा ठराव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांना एतेसाब फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार रईस शेख यांनी राज्यघटनेची प्रत भेट दिली.