दोन्ही नेत्यांचे कितपत जमेल याबाबत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये साशंकता
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधव तर कार्याध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी आक्रमक स्वभावाच्या या दोन नेत्यांमध्ये विधानसभेच्या सभागृहात अनेकदा चकमकी उडाल्या आहेत. यापाश्र्वभूमीवर या दोन नेत्यांमध्येच योग्य मेळ राखण्याची कसरत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला करावी  लागेल, अशी चिन्हे आहेत. अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अशी दोन पदे निर्माण करून पक्षाने पायात पाय अडकविल्याने, उभयतांचे कितपत जमेल याबाबत पक्षामध्ये साशंकता आहे.
कोकणात नारायण राणे आणि सुनील तटकरे या दोन दिग्गज नेत्यांना एकाच वेळी भिडण्याचे धारिष्ट जाधव यांनी दाखविले. एखादी गोष्ट पटत नसल्यास त्यावर स्पष्ट भाष्य करण्यात जाधव हे प्रसिद्ध आहेत. शिवसेनेच्या मुशीत तयार झालेले जाधव हे सहजासहजी माघार घेत नाहीत. जितेंद्र आव्हाड हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निकटचे समजले जातात. जाधव यांच्याप्रमाणेच आक्रमक स्वभावाचे आव्हाड हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात. जाधव हे नगरविकास खात्याचे राज्यमंत्री असताना त्यांचे आणि आव्हाड यांच्यात फारसे सख्य नव्हते. अनेकदा जाधव यांनी दिलेल्या उत्तरांवरून आव्हाड यांचे समाधान होत नसे. हिवाळी अधिवेशनात ठाणे महानगरपालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या चौकशीची घोषणा जाधव यांनी करताच उभयतांमध्ये वादावादीही झाली होती. आव्हाड यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जाधव यांच्या विरोधात तक्रार केली होती, असे सांगण्यात येते.
जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदाचे वेध लागले होते. विस्तारात किमान राज्यमंत्री म्हणून आपली वर्णी लागेल या आशेवर आव्हाड होते. पण विस्तारात संधी मिळाली नाही. प्रदेशाध्यक्षपदी तरुण नेत्याला संधी दिली जाणार असल्याने आपली निवड होईल, असा आव्हाड यांना ठाम विश्वास होता. सकाळी सभेपूर्वी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची नव्या अध्यक्षांच्या निवडीबाबत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर सल्लामसलत सुरू होती तेव्हाही आव्हाड हे आशावादी होते. पक्षाध्यक्ष पवार यांच्याशी असलेल्या उत्तम संबंधामुळे आव्हाड हे जाधव यांच्या कलाने कितपत काम करतील याबाबतही साशंकता आहे. अर्थात, पवार यांनी डोळे वटारल्यास उभतांना जमवून घ्यावेच लागेल.

* दोन्ही  नेत्यांत फारसे सौख्य नाही
जाधव यांच्याप्रमाणेच आक्रमक स्वभावाचे आव्हाड हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात. जाधव हे नगरविकास खात्याचे राज्यमंत्री असताना त्यांचे आणि आव्हाड यांच्यात फारसे सख्य नव्हते. अनेकदा जाधव यांनी दिलेल्या उत्तरांवरून आव्हाड यांचे समाधान होत नसे. हिवाळी अधिवेशनात ठाणे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या चौकशीची घोषणा जाधव यांनी करताच उभयतांमध्ये वादावादीही झाली होती.

Story img Loader