मुंबई : देशातील जनतेचा कौल कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच, मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील लढती लक्षवेधी ठरल्या. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये रंगलेल्या लढतीत महाविकास आघाडीचे पारडे जड ठरले. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आणि कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) मुंबईतील मुख्य कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळून विजयाचा जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत, तुतारी वाजवत आणि ढोल – ताशांच्या तालावर नाचत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे मुंबईतील नेते व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ ‘टीम राष्ट्रवादीचे कॅप्टन कूल’ आणि ‘टप्प्यात आला की विनिंग शॉर्ट’ अशा आशयाची फलकबाजी करण्यात आली होती.

हेही वाचा >>> टीव्हीवर निकालांचा धुराळा, तर मुंबईतील रस्त्यांवर शुकशुकाट; मुंबईकरांचं मतमोजणीकडे लक्ष!

नरिमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून विजयाचा जल्लोष साजरा केला. डीजे आणि ढोल – ताशांच्या तालावर नाचत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपने विजयाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विजापूर येथील लोककलावंतांना आमंत्रित केले होते. ‘देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. या जल्लोषात भाजपचे नेते, पदाधिकारी व मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणांहून आलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेले फलक हातात घेऊन कार्यकर्ते नाचत होते. विजयाच्या जल्लोषात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना लाडू वाटण्यात आले. तसेच, शिवसेना शिंदे गटाच्या नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन कार्यालयासमोर सायंकाळी ४ वाजता कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि एकमेकांना पेढे भरवत विजयाचा जल्लोष साजरा केला. हा जल्लोष १५ ते २० मिनिटे सुरू होता. त्यानंतर बाळासाहेब भवन येथे शांतता होती.

हेही वाचा >>> दारूच्या नशेत दुचाकीवरील तिघांची दुभाजकाला धडक

दादर येथील शिवसेना भवनासमोरही शिवसैनिकांनी गुलालाची उधळण करीत घोषणा देत विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसैनिकांनी गळ्यात भगवे शेले, डोक्यावर भगवी टोपी आणि हातात झेंडे घेऊन घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. तसेच, एकमेकांना पेढे भरवत आणि नाचत कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळला. शिवसेना भवन समोर केलेली फलकबाजीही लक्षवेधी ठरली. राजकीय पक्षांच्या मुख्य कार्यालयांपाठोपाठ विजयी उमेदवारांच्या मतदारसंघातही कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय पाटील विजयी झाले. संजय पाटील यांचे भांडुप येथील कार्यालय आणि घराबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग येथील शाखांबाहेर कार्यकर्ते बहुसंख्येने जमले होते. यावेळी ढोल – ताशांचा गजर करीत, गुलाल उधळत, एकमेकांना पेढे, लाडू भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘आवाज कुणाचा’, ‘कोण आला रे कोण आला…’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता. संजय पाटील यांच्या भांडुप येथील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांसह मुस्लिम, कोळी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. कोळी समाजाच्या नागरिकांनी पारंपरिक नृत्य करीत आनंद व्यक्त केला. तसेच मुस्लिम बांधवांनी गुलाल उधळत जल्लोष केला.