मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुलातील ३४०० चौरस मीटर जागेवर लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रशासकीय इमारत अर्थात पर्यावरण भवन उभे राहणार आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बीकेसीतील ३४००.५९ चौटर मीटर जागा ८० वर्षांच्या भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंबंधीच्या प्रस्तावाला गेल्या आठवड्यात झालेल्या एमएमआरडीए प्राधिकरणाच्या १५९ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. म्हणून नवीन प्रशासकीय इमारतीची गरज जल, वायू आणि इतर प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रदषण नियंत्रण मंडळावर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्यालय शीव येथील कल्पतरू पाॅईंट या इमारतीत आहे. मागील काही वर्षांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामाची व्याप्ती वाढत आहे. जल, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या या मंडळावर आता बांधकाम, जैव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन आणि हाताळणी, प्लास्टिक प्रदूषण, कचरा प्रदूषण, माती प्रदूषण अशा अनेक प्रकारच्या प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी आहे.

परिणामी, मंडळाला आता मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांच्या विकासाची गरज निर्माण झाली र्प्रदूषण नियंत्रण मंडळात सध्या ७०० ते ८०० मनुष्यबळ असून त्यात लवकरच १००० ने वाढ होणार आहे. मंडळातील १००० पदे भरण्यात येणार आहेत. याअनुषंगाने सध्याचे कार्यालय अपुरे पडण्याची शक्यता असून भव्य प्रशासकीय इमारतीची गरज लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी मंडळाने एमएमआरडीएकडे जागेची मागणी करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ही मागणी मान्य करून एमएमआरडीएने अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाला जागा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.

मंडळाला मोजावे लागणार ४६८ कोटी ६० लाख रुपये

बीकेसीतील जी ब्लाॅकमधील सी ७९ या भूखंडावर पर्यावरण भवन उभे राहणार असून हा भूखंड एकूण ३४००.५९ चौस मीटर क्षेत्रफळाचा आहे. यावर मंडळाला चार चटईक्षेत्र निर्देशांकाप्रमाणे १३,६०२.३६ चौरस मीटर इतके बांधकाम क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे. या जागेसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला ४६८.६० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. दोन महिन्यांत यापैकी २५ टक्के रक्कम मंडळाला अदा करावी लागणार आहे. त्यानंतर पुढील दहा महिन्यांच्या आत उर्वरित ७५ टक्के रक्कम भरणे गरजेचे आहे. लवकरच २५ टक्के रक्कम एमएमआरडीएला अदा केली जाणार असल्याचेही प्रदूषण नियंत्रण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या काही वर्षांतच बीकेसीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे भव्य पर्यावरण भवन उभे राहणार असून येथूनच मंडळाचा कारभार चालणार आहे.