वाढत्या प्रवासी संख्येमुळे स्थानकांवर ताण; सुविधा वाढवण्याचा ‘एमआरव्हीसी’चा निर्णय

मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरील वाढत्या प्रवासी संख्येमुळे स्थानकांतील सोयीसुविधांवर ताण वाढू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) स्थानकांचा विकास करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

रेल्वेची उपनगरीय सेवा स्वस्त आणि झटपट प्रवासाचे साधन आहे. परंतु गेल्या काही वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या वाढतच आहे. त्यातच बाहेरून येणारे लोंढे आणि स्वस्तात मिळणारी घरे यामुळे उपनगराकडे राहण्याचा ओढा तर अधिकच वाढत आहे. त्यामुळेच मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्या गेल्या चार वर्षांत चार लाखांनी वाढली आहे. यात ठाणे, डोंबिवली, कल्याण, दिवा, बदलापूरमध्ये वाढच होत आहे. पश्चिम रेल्वेवरही तीच परिस्थिती आहे. गेल्या चार वर्षांत १ लाख ५४ हजार प्रवाशांची भर पडली असून वांद्रे, अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली, भाईंदर, नालासोपारा, विरार स्थानकांतून मोठय़ा प्रमाणात प्रवासी प्रवास करतात.

एकंदरीतच वाढत जाणारी प्रवासी आणि त्यामुळे पडणारा अतिरिक्त ताण पाहता स्थानकातील सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळेच पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी स्थानकातही चेंगराचेंगरीसारख्या  घटनेलाही सामोरे जावे लागले. स्थानकातील सुविधा कशा वाढवता येतील, गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी व प्रवास सुकर करण्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील, याची चाचपणी एमआरव्हीसीकडून होत आहे. त्यासाठीच सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणासाठी एका सल्लागाराचीही नियुक्ती केली जाईल. मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील गर्दी, स्थानकात दरदिवशी येणारे-जाणारे प्रवासी, प्रवाशांचा ओघ, कोंडी टाळण्याच्या उपायांसह अनुकरण अभ्यास केला जाईल. याशिवाय स्थानकात आलेल्या प्रवाशाचा पुढचा प्रवास होण्यासाठी कोणते स्थानक कोणत्या दिशेने येते, पादचारी पूल कुठे-कुठे आहेत, कोणत्या फलाटातून लोकल कुठे-कुठे जातात इत्यादी माहिती दर्शविणारे फलकही स्थानकात बसवण्याची योजना आहे. या मॉर्डन यंत्रणेसह, अत्याधुनिक प्रवासी माहिती यंत्रणा कार्यान्वितही करण्यावर एमआरव्हीसीकडून भर दिला जाणार आहे. त्यासाठी सल्लागाराची मदत घेण्यात येणार असल्याचे

सांगितले.

मध्य रेल्वे उपनगरीय प्रवासी संख्या

वर्ष                 प्रवासी संख्या

२०१५-१६      ४० लाख २७ हजार

२०१६-१७      ४१ लाख ८० हजार

२०१७-१८      ४२ लाख ३९ हजार

२०१८-१९       ४४ लाख ३० हजार

पश्चिम रेल्वे उपनगरीय प्रवासी संख्या

वर्ष                 प्रवासी संख्या

२०१५-१५      ३४ लाख ३४ हजार ३१७

२०१६-१७      ३५ लाख १९ हजार

२०१७-१८      ३५ लाख ५० हजार ६९९

२०१८-१९      ३५ लाख ८८ हजार

स्थानकात वाढत जाणारी गर्दी आणि त्यामुळे सुविधांवर ताण पडत आहे. प्रवाशांचा ओघ टाळण्याच्या उपाययोजनांसह सुविधा वाढवण्यासाठी म्हणूनच सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याच्या अहवालानुसार पश्चिम, मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसी स्थानकात सुधारणा करू शकतील. रवी शंकर खुराना, व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी

Story img Loader