मुंबई : पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर स्थानकातून धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३१ वर्षीय प्रवाशाला प्राण गमवावे लागले. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात प्रवाशाचा तोल गेला आणि तो लोकल आणि स्थानकामधील मोकळ्या जागी अडकला. लोकलबरोबर तो फरफटत काही अंतरावर गेला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राम मंदिर रेल्वे स्थानकात सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास कामावरून परतीचा प्रवास करताना फलाट क्रमांक ३ वरून प्रवासी राहुल थोरवत (३५) धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच वेळी लोकलचा दांडा हातून सुटला आणि राहुलचा तोल गेला. लोकल आणि स्थानकातील मोकळ्या जागी तो पडला. त्यानंतर काही अंतरापर्यंत लोकलबरोबर तो फरफटत गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली.

हेही वाचा >>> शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

नालासोपारा येथे राहणारा राहुल गेल्या दहा वर्षांपासून सुरक्षा रक्षकाची नोकरी करीत होता. राहुल मूळचा कोल्हापूरचा होता. नोकरीनिमित्त मुंबईत आला होता. गेल्या दोन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. चार वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन बहिणी असा परिवार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger dies after falling from local ram mandir station western railway mumbai print news ysh
Show comments