मुंबई : इस्त्रीमध्ये लपवून सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न सीमाशुल्क विभागाने हाणून पाडला आहे. याप्रकरणी दोन इस्त्र्यांमधून सव्वा किलो सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत एक कोटी दोन लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. आरोपी प्रवाशाला सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय असून त्याबाबत सीमाशुल्क विभाग अधिक तपास करत आहेत.

जेद्दाह येथून मुंबईला आलेल्या प्रवाशाला संशयावरून शुक्रवारी विमानतळावर अडवण्यात आले होते. त्याची झडती घेण्यात आली. तसेच त्याच्याकडील वस्तूंची स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात आली. त्यावेळी दोन इस्त्र्यांमध्ये काही संशयीत भाग असल्याचे आढळले. इस्त्री फोडल्यानंतर २४ कॅरेट सोन्याच्या तुकडे सापडले. दोन इस्त्र्यांमध्ये मिळून एकूण १६ तुकडे जप्त करण्यात आले. त्यांचे एकूण वजन १२०० ग्रॅम आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत एक कोटी दोन लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर आरोपी प्रवाशाला सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सोने तस्करीसाठी नवनवीन फंडे

सोने तस्करीसाठी तस्कर विविध क्लृप्त्या लढवत आहेत. चॉकलेटचा थर चढवलेले सोने वेष्टनात दडवून तस्करी केली जाते. याशिवाय गृहउपयोगी वस्तू, लॅपटॉप, हेअर ड्रायरसारख्या वस्तूंमध्ये सोने लपवूनही त्याची तस्करी केली जाते. सध्या शरीरात, अंतर्वस्त्रांमध्ये लपवूनही सोन्याची तस्करी केली जाते. सोन्याची भुकटी कॅप्सूलमध्ये लपवून ती गिळूनही तस्करी केल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय सोन्याची भुकटी करून मेणामध्येही लपवून त्याची तस्करी केली जाते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सोन्याची तस्करी का होते?

भारतात सोन्याला अधिक मागणी आहे. ही गरज भागवण्यासाठी सोने आयात करण्याचेही पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी सरकारने दिलेल्या परवान्याची आवश्यकता असते. आयात केलेल्या सोन्यावर सीमाशुल्क आणि इतर शुल्कासह सुमारे २५ टक्के रक्कम भरावी लागते. तसेच आयात करण्यासाठी काळ्या पैशांचा वापर केल्यास अटक होऊ शकते. पण तस्करी मार्गे सोने भारतात आणले, तर एका किलोमागे लाखो रुपये फायदा होता. तसेच काळे पैसे तस्करीतून चलनात आणता येऊ शकतात. त्यामुळे आयातीचा पर्याय उपलब्ध असतानाही सोन्याची तस्करी केली जाते.

विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची पडताळणी, बॅगांची काटेकोरपण तपासणी, श्वान पथके, गुप्त माहिती, तसेच आखाती देश व इतर संवेदनशील ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांच्या विशेष तपासणीच्या माध्यमातून सोन्याची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सीमाशुल्क विभाग व डीआरआय या यंत्रणा सोने तस्करी रोखण्यासाठी सक्रीय आहेत. तसेच विमानतळावर केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांना तस्करी रोखण्यासाठी बॅगा तपासणीचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.