मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणारी दादर – रत्नागिरी पॅसेंजर दादरऐवजी दिव्यावरून चालवण्यात येत असल्याने मुंबईतील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत सातत्याने मागणी करूनही रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. मोकळा रेल्वे मार्ग, फलाट उपलब्ध नसल्याची कारणे पुढे करीत रेल्वे प्रशासन सीएसएमटी किंवा दादरवरून रेल्वेगाडी चालवण्यास नकार देत आहे. याउलट दादर – गोरखपूर, दादर – बलिया रेल्वेगाडी चालवून परप्रांतीयांसाठी रेल्वे मार्ग मोकळा करण्यात येत आहे. परिणामी, दादर – रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यासाठी प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याबाबत उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाने रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

करोनाकाळात दादर – रत्नागिरी पॅसेंजर मुंबईपासून दूर असलेल्या दिवासारख्या लहान स्थानकातून चालवण्यात सुरुवात केली आहे. याचा फटका मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील कोकणवासियांना बसत आहे. दादर – रत्नागिरी पॅसेंजर पूर्वी दुपारी सोडण्यात येत होती. रेल्वे प्रशासनाने दादर – गोरखपूर (आठवड्यातून चार दिवस) आणि दादर-बलिया (आठवड्यातून तीन दिवस) या उत्तर प्रदेशात जाणाऱ्या रेल्वेगाड्या त्याच वेळी चालवण्यात सुरुवात केली आहे. मात्र रेल्वे प्रशासन दादर – रत्नागिरी पॅसेंजरसाठी रेल्वे मार्ग मोकळा नसल्याचे, फलाट उपलब्ध नसल्याचे स्पष्टीकरण देत आहे. मात्र परप्रांतीयांच्या रेल्वेगाड्यांसाठी रेल्वे मार्ग कसा उपलब्ध होतो, असा प्रश्न उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाने उपस्थित केला आहे.

गेल्या अनेक वर्षात सीएसएमटी, दादर, एलटीटीवरून परराज्यात ये – जा करणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय राज्यातील नागरिकांच्या सोयी अथवा गैरसोयीचा नसून हा प्रश्न कोकण रेल्वेच्या निर्मितीसाठी रेल्वे मंत्रालयाला सर्वाधिक निधी देणाऱ्या राज्याचा व राज्यातील जनतेच्या अस्मितेचा आहे. अनेक प्रवासी संघटना याबाबत वारंवार आवाज उठवत आहेत. परंतु, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने याकडे गांर्भीयाने लक्ष देणे आवश्यक आहे, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाकडून सांगण्यात आले.

दिवा – रत्नागिरी पॅसेंजरचा विस्तार सीएसएमटीपर्यंत करणे आवश्यक आहे. संपूर्ण मुंबईतील प्रवाशांना ही गाडी सोयीस्कर होईल. तसेच सध्या दिवा स्थानकात रेल्वेगाडीमध्ये पाणी भरण्याची सुविधा नसल्याने ही रेल्वेगाडी पनवेल येथे पाणी भरण्यासाठी नेली जाते. त्यासाठी दिवा – रत्नागिरी पॅसेंजर पनवेलमध्ये ३० ते ४५ मिनिटे उभी राहते. तसेच, मध्य रेल्वेवरील ९ थांबे रद्द करूनही मध्य रेल्वेवर या गाडीच्या प्रवास वेळेत विशेष घट झालेली नाही. एका थांब्यासाठी ८ ते १० मिनिटे गृहीत धरून किमान एक तासाची घट अपेक्षित होती. मात्र, फक्त १० ते २० मिनिटांची घट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवा – रत्नागिरी पॅसेंजरचा दादर किंवा सीएसएमटीपर्यंत विस्तार करणे अपेक्षित आहे, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे म्हणणे आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कोकणातील सर्व नागरिकांनी विविध माध्यमांतून रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे दादर – रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच मागील १० ते १५ वर्षांपासून सकाळी दादर – चिपळूण जलद पॅसेंजर सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. वारंवार लोकप्रतिनिधींनी थेट रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करूनही काहीही उपयोग झालेला नाही. मार्च २०२३ मध्ये तत्कालीन रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या होत्या. परंतु, त्याबाबतही कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही, असे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीकडून सांगण्यात आले.

Story img Loader