मुंबई : जुन्या रेल्वेगाड्या चालवणे आता प्रवाशांच्या जीवावर बेतण्यास सुरुवात झाली आहे. धावत्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या छताचा (सिंलिग) काही भाग नुकताच पडला. यावेळी प्रवासी थोडक्यात बचावले. या घटनेमुळे रेल्वे प्रवास मृत्यूच्या छायेतून होत असल्याची भावना प्रवाशांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाडी क्रमांक १२६१९ / १२६२० लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस ही एक महत्त्वाची एक्स्प्रेस आहे. या एक्स्प्रेसमधून काही दिवसांपूर्वी युट्यूबर चिन्मय कोळे प्रवास करीत असताना रेल्वेगाडीच्या छताचा काही भाग पडला. मात्र, कोळे थोडक्यात बचावले. परंतु, या घटनेनंतर मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील बोंगळ कारभार प्रकाशझोतात आला.

हेही वाचा…वात्रक नदीवर बुलेट ट्रेनचा पूल उभा, बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दहावा नदी पूल पूर्ण

देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रवासी, पर्यटक आणि व्यापाऱ्यांसाठी मे १९९८ रोजी मत्स्यगंधा एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र गेल्या २६ वर्षांत या रेल्वेगाडीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या रेल्वेगाडीचे डबे खराब झाले असून, मोडकळीस आले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून प्रवासी संघटनाकडून या रेल्वेगाडीला लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डबे जोडण्याची मागणी रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंडळ आणि दक्षिण रेल्वेकडे करण्यात येत आहे. तर, जुलै २०२४ रोजी उडुपी – चिकमंगलुरू येथील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान मत्स्यगंधा एक्स्प्रेससाठी एलएचबी डबे जोडण्याची मागणीही केली होती. मात्र, या मागणीवर कोणतेही सकारात्मक पाऊल न उचलल्याने प्रवाशाचा जीव धोक्यात आला आहे.

मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या देखभाल दुरुस्तीचे काम दक्षिण रेल्वे विभागाकडे आहे. मात्र, एक्स्प्रेसच्या छताचा काही भाग पडल्यानंतर त्याची तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करण्यात आली. तसेच या घटनेची माहिती दक्षिण रेल्वेला देण्यात आली आहे. तर, पुढील कार्यवाही दक्षिण रेल्वेकडून केली जाईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा…म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी आता ५० टक्के प्रतीक्षा यादी, प्रतीक्षा यादीसाठी दहा घरामागे एकऐवजी पाच विजेते

रेल्वे प्रवास करताना कायम शयनयान डब्याला प्राधान्य दिले आहे. मात्र, आरामशीर आणि थंडगार प्रवास करण्यासाठी मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास केला. मुंबई – मंगळुरू असा थेट प्रवास करत होतो. चिपळूण येथे रेल्वेगाडी थांबली असता काही खाद्यपदार्थ घेण्यास स्थानकात उतरलो. त्यानंतर पुन्हा एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करतानाच रेल्वेगाडीच्या छताचा भाग पडला. छताचा भाग डोक्यावर पडण्यापासून थोडक्यात बचावलो. – चिन्मय कोळे, प्रवासी

हेही वाचा…बीकेसीतील पॉडटॅक्सीसाठी दक्षिणेतील दोन कंपन्या उत्सुक, लवकरच निविदा अंतिम होणार

गेल्या अनेक वर्षांपासून मत्स्यगंधा एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडण्यासाठी, नवीन रेक मिळण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेत आणखी भर पडेल. परंतु, रेल्वे मंडळ, रेल्वे मंत्रालयाकडून याबाबत कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही. – अक्षय महापदी, सदस्य, कोकण रेल्वे समिती

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger safety at risk part of matsyagandha express roof falls highlighting urgent need for upgrades mumbai print news psg