मुंबईहून हावडय़ाला जाणारी मेल अचानक रद्द झाल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी गुरुवारी सायंकाळी सीएसटी स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न केला. या गोंधळाचा कोणताही परिणाम उपनगरी रेल्वे वाहतुकीवर झाला नाही.
हावडा मेल रद्द झाल्याचे रेल्वे प्रशासनाने वेळेत न कळविल्यामुळे या गाडीचे आरक्षण असलेले प्रवासी सायंकाळपासूनच सीएसटी येथे आले होते. या गाडीची वेळ झाल्यावरही गाडी फलाटाला लागली नसल्याबद्दल प्रवाशांनी विचारणा केली असता त्यांना गाडी रद्द झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी सीएसटी स्थानकामध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. लांब पल्ल्याच्या गाडय़ा रोखून धरण्याचा प्रयत्नही या प्रवाशांनी केला. मात्र उपनगरी रेल्वे वाहतुकीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. ‘आम्ही गाडी रद्द झाल्याचे योग्य वेळेमध्ये सांगितले होते. त्याचप्रमाणे सर्व स्थानकांवर गाडी रद्द झाल्याच्या सूचना देण्यात येत होत्या. मात्र प्रवाशांनी त्या न ऐकल्यामुळे गाडी पकडण्यास आलेल्या प्रवाशांनी हा गोंधळ घातला,’ असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विद्याधर मालेगावकर यांनी सांगितले.

Story img Loader